पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून पुणे हे गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनले आहे. मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटे स्वारगेट एसटी स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली असल्याची माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे हे गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनले आहे. मंगळवारी पहाटे स्वारगेट एसटी स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सध्या आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली असल्याची माहिती दिली आहे.
स्वारगेट घटनेप्रकरणी प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतील वाड्या-वस्त्यांमधून मुली पुण्यात शिकायला येत असतात. पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. कारण पुण्यात शिकायला येणा-या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे.
पीडित मुलीने सकाळी साडेनऊ वाजता पोलिसांत तक्रार नोंदवली. अत्याचाराची घटना असल्याने पोलिस जातीने या प्रकरणात लक्ष घालत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने केलेल्या वर्णनानुसार आरोपीची माहिती गोळा केली जात आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच ग्रामीण आणि स्वारगेट भागात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीचा सीडीआर काढला असल्यामुळे लोकेशननुसार त्याचा माग काढला जात आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.