मुंबई :
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील सरपंच होता. त्याच्या हत्येचे आपल्यालाही दु:ख आहे. मात्र या प्रकरणात राजकारण केले जात आहे. त्यातूनच आपले नाव पुढे केले जात आहे. पण या प्रकरणाशी आपला काहीएक संबंध नाही. उलट या हत्येत जो कोणी असेल, अगदी माझ्या जवळचा जरी असला तरी त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्या विभागाची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांबरोबर बोलत होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवले जात आहे. विरोधकांनी तर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यात भाजपचे आमदारही मागे नाहीत. त्यामुळे धनंजय मुंडे यांची चारही बाजूने कोंडी झाली होती. त्यात त्यांना मंत्री केले जाते की नाही याची चर्चा सुरू होती. पण अखेरच्या क्षणी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या टीकेची धार आणखी वाढत गेली. हत्या करणा-यांचा मास्टरमाईंड कोण अशी विचारणा विरोधक करत होते. त्यावर चौकशी करा. दोषी असेल त्याला शिक्षा करा, असे धनंजय मुंडे म्हणाले होते.
त्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी मस्साजोगच्या गावक-यांनी अजित पवारांकडे केली होती. बारामतीतही एक शिष्टमंडळ अजित पवारांना भेटले होते. त्यांनीही अशीच मागणी केली होती. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. संतोष देशमुखांची हत्या ज्यांनी कोणी केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ते फासावर गेले पाहिजेत, या मताचा मी पहिल्या दिवसापासून होतो, असे धनंजय मुंडे म्हणाले.
संतोष देशमुख यांच्याबाबत आदर होता. तो माझ्या जिल्ह्यातील सरपंच होता. जे कोण त्याचे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मग ते कोणी असोत. ते कोणाच्याही जवळचे असोत. अगदी माझ्या जवळचे असले तरी त्याला सोडू नका, अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. पण हे सांगत असताना राजकारणापोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. ते चुकीचे आहे. हे आरोप थांबवले गेले पाहिजेत, असे मी सांगेन असे ते यावेळी म्हणाले.