मुंबई : वृत्तसंस्था
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान एकमेकांसमोर आले आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या आर्यनच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजमधील एका भूमिकेवर वानखेडेंनी आक्षेप घेतला आहे.
याविरोधात त्यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यनच्या या सीरिजमध्ये वानखेडेंसारखी एक भूमिका दाखवण्यात आली आहे. ती भूमिका साकारणारा अभिनेतासुद्धा हुबेहूब समीर वानखेडेंसारखाच दिसतो. या चित्रणावरून मला आणि माझ्या कुटुंबीयांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याची तक्रार वानखेडेंनी कोर्टात केली.
याप्रकरणी आज (बुधवार) सुनावणी झाली असून न्यायालयाने नेटफ्लिक्स, रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि इतरांविरुद्ध नोटीस बजावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि इतरांना सात दिवसांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
वानखेडेंनी दाखल केलेल्या याचिकेत शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी खानच्या मालकीची रेड चिलीज एंटरटेन्मेंट कंपनी, नेटफ्लिक्स आणि इतरांचा उल्लेख आहे. याप्रकरणी कायमस्वरूपी आणि अनिवार्य आदेश देण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येकी दोन कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. ही रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दान करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘या वेब सीरिजमध्ये ड्रग्जविरोधात काम करणा-या संस्थांचे दिशाभूल करणारे आणि नकारात्मक चित्रण करण्यात आले आहे. यामुळे अशा संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो. या सीरिजमुळे मला, माझ्या पत्नीला आणि बहिणीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. हे अत्यंत धक्कादायक आणि अपमानास्पद आहे’, असे वानखेडेंनी याचिकेत म्हटले आहे.