25.3 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeसंपादकीयआला रे, आला....!

आला रे, आला….!

मोसमी पाऊस शनिवारी केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बळिराजासाठी ही आनंदवार्ता आहे. गत दोन दिवसांपूर्वी मोसमी वा-यांची वाटचाल केरळच्या दिशेने होण्यास पोषक वातावरण असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यंदा मोसमी वारे केरळमध्ये सरासरी वेळेच्या ८ दिवस आधी आणि मागील १६ वर्षांच्या तुलनेत लवकर दाखल झाले आहेत. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा मोसमी वारे अंदमानमध्येही लवकर दाखल झाले होते. नेहमीच्या वेळेआधीच म्हणजे १३ मे रोजी मोसमी वारे दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाले होते. त्यानंतरही पोषक वातावरण असल्याने मोसमी वा-यांची वाटचाल जलद गतीने सुरू होती. मोसमी वारे केरळमध्ये २७ मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र अंदाजित वेळेच्या आधी एक दिवस आधीच मोसमी वारे केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

मोसमी वा-यांनी शनिवारी संपूर्ण केरळ आणि तामिळनाडूचा बहुतांशी भाग व्यापून कर्नाटकच्या काही भागापर्यंत प्रगती केली आहे. याबरोबरच दक्षिण अरबी समुद्राचा संपूर्ण भाग, संपूर्ण लक्षद्वीप बेटे, पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग, उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग तर मिझोरामच्या काही भागात मोसमी पाऊस एक दिवस आधीच दाखल झाला. मोसमी वा-यांनी शनिवारी गोव्यापर्यंत मजल मारली. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात दाखल होतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. केरळमध्ये मोसमी पाऊस सामान्यत: १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर म्हणजे २७ मे ते ५ जून दरम्यान पावसाचे आगमन होते. यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो. यंदा नैऋत्य मोसमी वा-याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले होते. त्यानुसार केरळमध्ये शनिवारी मोसमी पाऊस दाखल झाला आहे. गतवर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर नैऋत्य मोसमी वा-यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेआधी म्हणजे ३० मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता.

यापूर्वी २३ मे २००९ रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी शनिवार, २४ मे रोजी मोसमी पाऊस वेळेआधी केरळमध्ये दाखल झाला आहे. आता राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उर्वरित भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा कहर ३० मे पर्यंत कायम राहणार आहे. राज्याच्या सर्वच भागात गत आठ दिवसांपासून मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनच्या पावसामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढते, भूजल आणि जलाशयांचे पुनर्भरण होते आणि खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होतो. यंदा आयएमडीने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे खरीप हंगामात पिकांचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम देशाच्या शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होईल.

मान्सूनचा प्रवास वेगवान असल्याने कोकण किनारपट्टीवर ३१ मे ते २ जून पर्यंत पाऊस पोहोचेल. मुंबईतही याच कालावधीत मान्सूनच्या पहिल्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. १९ मे पासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे, जो मान्सूनपूर्व पावसाचा भाग आहे. मध्य महाराष्ट्रात (पुणे, नाशिक, सातारा) आणि मराठवाड्यात २ ते ५ जून दरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. विदर्भात मान्सून साधारणपणे ५ ते ७ जून दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. कारण मान्सूनचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतो. यंदा मान्सूनच्या हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा एल निनो परिस्थितीचा प्रभाव नसल्याने मान्सूनच्या पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची अपेक्षा आहे. पुढच्या दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा राज्यातील ८५ तालुक्यांना फटका बसला आहे. मका, ज्वारी, भाजीपाला, संत्रा, भात, आंबा, फळपिके यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. कोकणात सध्या जोरदार मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे.

केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतक-यांमध्ये सकारात्मक चित्र आहे. केरळनंतर आता काही दिवसांत मान्सूनचा प्रवेश दक्षिण आणि मध्य भारतात होणार आहे. दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिना-यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गत दोन दिवसांपासून या भागात प्रचंड पाऊस सुरू आहे. येत्या ३६ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात लातूरसह धाराशिव, बीड, परभणी, हिंगोलीतही शनिवारपासून दमदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात शेतपिके, फळझाडांची मोठी हानी झाली. शेतातील पिके जागेवरच नासली आहेत. राज्यात सतत पाऊस कोसळत असल्याने शेतक-यांची खरीप मशागतीची कामे खोळंबली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR