नांदेड : विशेष प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचे समर्थक असलेले मारोतराव कवळे गुरुजी हे उमेदवारी मिळावी यासाठी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु पालकमंत्र्यांनी भेट नाकारल्यामुळे त्यांचे खासगी सचिव डॉ.निशिकांत देशपांडे यांची भेट घेऊन ते परतले. त्यामुळे मारोतराव कवळे गुरुजींचा आवळा देऊन कोहळा काढण्याच्या प्रयत्नाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उमेदवारी मिळण्याच्या इच्छेने पक्षात दाखल होणा-यांसाठी हा एक धडा असल्याचे सांगण्यात येते.
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचे समर्थक असलेले उमरी तालुक्यातील नेते मारोतराव कवळे गुरुजी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात दाखल झाले. त्यानंतर नायगाव मतदारसघातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी खा.चव्हाणांना साकडे घातले. परंतु पालकमत्र्यांची भेट घेतल्याशिवाय उमेदवारी निश्चित होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसमवेत थेट मुंबई गाठली. पालकमंत्री महाजन यांच्याकडे गेल्यानंतर मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. पालकमंत्र्यांनी त्यांना भेट नाकारली. त्यामुळे आपल्या समर्थकांमध्ये वेगळा संदेश जाऊ नये यासाठी पालकमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. निशिकांत देशपांडे यांची भेट घेत त्यांना बुके देऊन कवळे गुरुजी परतले.
यामुळे त्यांची कृती दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आपल्या उमेदवारीबाबत पालकमंत्र्यांना गळ घालावी, असा संदेश तर कवळे गुरुजींना द्यायचा नसावा ना, याबाबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे तत्कालिन काळात नांदेडचे उपजिल्हाधिकारी म्हणून डॉ.निशिकांत देशपांडे यांनी केले. या काळात सर्वसामान्यांसह कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे प्रश्न, कामे वेळेत निकाली काढण्यात त्यांचा पुढाकार होता. यामुळे आजही ते सर्वांनाच आपले वाटतात. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोणतेही पदाधिकारी, राजकारणी पालकमंत्र्यांकडे गेले तर ते डॉ. निशिकांत देशपांडे यांना भेटल्याशिवाय परतत नाही. आपले कोणतेही काम असो ते डॉ.निशिकांत देशपांडे यांना सांगितल्यास मार्गी लागते, अशी प्रत्येकाची भावना आहे.
भारतीय जनता पक्ष हा संघाच्या शिस्तीवर चालणारा पक्ष आहे, याची कवळे गुरुजींना माहिती नसावी. त्यांच्याप्रमाणेच अन्य पक्षातील खा.चव्हाण यांचे समर्थक उमेदवारीच्या इच्छेने भाजपमध्ये दाखल होत आहेत. कवळे गुरुजींना आलेला हा अनुभव उमेदवारी इच्छुकांसाठी संदेश असावा, असे मानले जात आहे. भारतीय जनता पक्षातील शिस्त नव्यांना अंगिकारावी लागेल, हे स्पष्ट आहे. परंतु आवळा देऊन कोहळा काढण्याचा मारोतराव कवळे यांचा प्रयत्न मात्र फसला हे मात्र खरे! या भेटीप्रसंगी योगायोगाने उपस्थित असलेले कवळे गुरुजींचे स्पर्धक बालाजी बच्चेवार यांच्यासह चैतन्य बापू देशमुख, अॅड.किशोर देशमुख व बाळू खोमणे आदी त्यांच्यासोबत होते.