दुबई : वृत्तसंस्था
सुपर ४ पात्रता सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. यासह रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान सुपर-४ च्या शर्यतीतून बाहेर पडला. श्रीलंकेच्या विजयाने बांगलादेशलाही सुपर-४ साठी पात्र ठरविले. श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज कुसल मेंडिस सामन्याचा नायक ठरला.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान मोहमद नबीच्या शानदार खेळीमुळे १६९ धावांपर्यंत मजल मारू शकला. अफगाणिस्तानच्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने १८.४ षटकांत ४ गडी गमावून विजय मिळवला. यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने श्रीलंकेकडून शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ५२ चेंडूत १० चौकारांसह नाबाद ७४ धावा केल्या. कुसल परेराने २० चेंडूत ३ चौकारांसह २८ धावा केल्या. कामिंदू मेंडिसने १३ चेंडूत २ षटकारांसह नाबाद २६ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान, अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी मोहम्मद नबीच्या शानदार खेळीमुळे अफगाणिस्तान १६९ धावा करू शकला.