सोलापूर :आषाढी एकादशी अवघ्या एक महिन्यावर आली आहे. त्यामुळे प्रशासने वारीचे नियोजन सुरू केले आहे. लवकरच संत परंपरेतील पालख्या पंढरीच्या दिशेने निघतील. वारकरी तसेच भाविक प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी सोलापूर एस.टी. महामंडळाने २२० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती एस.टी. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आहे. एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जमणाऱ्या लाखो भाविकांसाठी विशेष एस.टी. बसेसच्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे.
त्यादृष्टीने महामंडळाने तयारी सुरू केली आहे. वारकरी तसेच प्रवाशांचा सुखकर प्रवास, पंढरपूरजवळ तात्पुरते बसस्थानक उभारणे, प्रवाशांसाठी न्याहारीची व्यवस्था करणे आदी सुविधांच्या कामांना वेग आला आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी १३ जुलै ते २१ जुलैदरम्यान विशेष एस.टी. गाड्यांचे नियोजन केले आहे. यासाठी २२० गाड्या धावणार आहेत. वारीनिमित्त सर्व गाड्या सज्ज ठेवाव्यात, गाड्यांची मोठी दुरुस्ती असल्यास ती तातडीने पूर्ण करावी, पावसाळ्याचे दिवस असल्याने बस दुरुस्ती कराव्यात, अशा सूचना सोलापूर विभागीय कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर याठिकाणी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून यात वाहतूक पर्यवेक्षक, यांत्रिक कर्मचारी, मार्गदर्शक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. पंढरपूर येथे चंद्रभागानगर, भीमा बसस्थानक मोहोळ रोड, श्री विठ्ठल बसस्थानक टेंभुर्णी रोड, श्री पांडुरंग बसस्थानक (सांगोला रोड) या चारठिकाणी बसस्थानक असेल.
आषाढी एकादशीसाठी सोलापूर विभागातून एस. टी. गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यात सोलापूर विभागातून २२० एस.टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने खबरदारी घेतली जाणार आहे.