बीड : प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथे एका तरुणाला बेदम मारहाण करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विकास अण्णा बनसोडे (वय २३) या ट्रक ड्रायव्हरला प्रेमसंबंधाचा संशय घेत कुटुंबानेच अमानुष मारहाण करून ठार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून चौघे फरार आहेत.
मूळचा जालना जिल्ह्यातील विकास बनसोडे हा भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मालकीच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. मात्र, मालकाच्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं. तरीही त्यांच्यातील संबंध कायम राहिल्याने कुटुंब संतापला. एक दिवस भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकास आणि त्यांच्या मुलीला घराच्या मागील शेतात एकत्र पाहिले. यानंतर त्याने अन्य आरोपींसोबत मिळून विकासला पकडले आणि दोन दिवस पर्त्याच्या शेडमध्ये डांबून ठेवत अमानुष मारहाण केली.
दोरी आणि वायरच्या सहाय्याने बेदम मारहाण केल्यानंतर विकास जागेवरच बेशुद्ध पडला. अखेर, त्याचा मृत्यू झाल्यानंतर मारेक-यांनी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि पसार झाले.
या हत्याकांडानंतर विकासच्या भावाने आकाश बनसोडेने पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सहा आरोपींना अटक झाली असून चार आरोपी अद्याप फरार आहेत.