नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गुजरातच्या अहमदाबादमध्ये होणा-या ऑलिम्पिक २०३६ साठी भारत सरकारकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. ऑलिम्पिकसाठी उच्च दर्जाच्या सुविधांच्या उभारणीसाठी मास्टर प्लॅनही तयार करण्यात आला आहे. अशातच बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या आसाराम बापूच्या मालकीच्या आश्रमाची जमीन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी वापरण्यात येणार असल्याचे समोर आलं आहे.
आसाराम बापूच्या आश्रमाची जागा सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह, ऑलिम्पिक व्हिलेज आणि इतर क्रीडा सुविधांसाठी २०३६ मध्ये होणा-या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी संपादित केली जाणार आहे.
गुजरातमधील मोटेरा येथील आसाराम बापूच्या आश्रमासह तीन आश्रमांची जमीन सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह, ऑलिम्पिक व्हिलेज आणि इतर क्रीडा सुविधांसाठी संपादित केली जाईल. त्यामुळे संत श्री आसाराम आश्रम, भारतीय सेवा समाज आणि सदाशिव प्रज्ञा मंडळ या तीन आश्रमांचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे. या जमिनी ताब्यात घेऊन तिन्ही आश्रमांना दुसरी जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अहमदाबाद महानगरपालिकेचे आयुक्त, अहमदाबादचे जिल्हाधिकारी आणि अहमदाबाद शहरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती यासाठी नियोजन करत आहे. समितीने या मास्टर प्लॅनसाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऑलिम्पिक व्हिलेज आणि इतर क्रीडा सुविधाही या ठिकाणी बांधल्या जाणार आहेत. हे सर्व अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमजवळ सुमारे ६५० एकर जागेवर बांधले जाणार आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी लागणा-या ६५० एकर जमिनीपैकी ६०० एकर जमीन भाट, मोटेरा, कोटेश्वर आणि सुगड इथली आहे. तर ५० एकर जमीन साबरमती रिव्हरफ्रंटवर आहे. या मास्टर प्लॅनमध्ये स्टेडियमजवळील शिवनगर आणि वंजारा वास या निवासी भागांच्या संपादनाचाही समावेश आहे. सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आजूबाजूला २८० एकर आणि रिव्हरफ्रंटलगत ५० एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. भाट आणि सुगडमध्ये २४० एकरांवर ऑलिम्पिक व्हिलेज उभारण्यात येणार आहे. प्रशासनाकडून आता भूसंपादनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.