नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील सर्वात मोठी इंडिगो एअरलाईन्सने कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्सला मागे टाकून जगातील सर्वात मूल्यवान एअरलाइन्स बनली.
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, इंडिगोच्या शेअरने (इंटरग्लोब एव्हिएशन) ५२६२.५ चा उच्चांक गाठला. त्यामुळे दुपारी अडीच वाजता कंपनीचे बाजार मूल्य २३.२४ बिलियन डॉलरवर पोहचले. ते अमेरिकेच्या डेल्टा एअरलाईन्सचे बाजार मूल्य २३.१७ बिलियन डॉलरहून अधिक झाले.
इंडिगो ही एकमेव भारतीय एअरलाईन आहे जी जगातील टॉप १० एअरलाईन्समध्ये स्थान मिळवते. इंडिगो दर आठवड्याला १५,७६८ फ्लाइट्स चालवते. असा डेटा एव्हिएशन अॅनालिटिक्स फर्म सिरियमने दिला आहे. ज्यात १२.७ टक्के वाढ झाली आहे. जे गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत जास्त आहे.
भारतातील हवाई प्रवासाच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी भारतीय एअरलाईन्स कंपन्यांनी २०२३ पासून अनेक मोठ्या विमान ऑर्डर दिल्या आहेत. एअर इंडिया समूहाने फेब्रुवारी २०२३ मध्ये ४७० विमाने ऑर्डर केली, त्यामध्ये २५० एअरबस आणि २२० बोईंग विमाने आहेत.
इंडिगो ने जून २०२३ मध्ये एअरबससोबत ५०० ए-३२० निओ विमाने खरेदी करण्याचा करार केला. ही जगातील सर्वात मोठी विमान ऑर्डर मानली जाते. २०२४ मध्ये अकासा एअरने बोईंगकडून १५० बी-७३७ मॅक्स विमाने ऑर्डर केली, तर इंडिगोने ३० ए-३५० विमाने खरेदी केली. जी तिच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.
भारतीय नागरी उड्डाण क्षेत्रातील वाढत्या क्षमतेमुळे आणि व्यावसायिकपणे चालवलेल्या एअरलाइन्समुळे भारत पुढील १५ वर्षांत जगातील विमानन केंद्र बनेल, असे एअरबसच्या ग्राहक खात्याचे प्रमुख एडवर्ड डेल्हाए यांनी २०२४ मध्ये सांगितले होते.
भारताकडे सध्या सुमारे ८०० मालवाहू विमाने आहेत आणि त्यामधून बहुतेक विमाने एअरबसची आहेत. इंडिगोच्या यशाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय विमानन क्षेत्राचा वाढता प्रभाव आणि विकास यामुळे भारत पुढील काळात जगातील विमानन क्षेत्रात प्रमुख स्थान मिळवू शकतो.