कोल्हापूर : प्रतिनिधी
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकवणारा प्रशांत कोरटकर याच्या आवाजाचे नमुने बुधवारी फॉरेन्सिकच्या अधिका-यांनी घेतले. त्याआधी मंगळवारी रात्री कोरटकरची पोलिसांनी पाच तास चौकशी केली. यावेळी सावंत यांना आपणच फोन केला होता. मोबाईलमधील डाटा स्वत: डिलिट केला, अशी कबुली कोरटकरने दिली. अटक टाळण्यासाठी हैदराबादमार्गे चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत तो होता, अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडीत राजारामपुरी पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी फॉरेन्सिकच्या दोन अधिका-यांनी कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले. त्याने फिर्यादी सावंत यांच्याशी मोबाईलवरून केलेला संवाद पोलिसांनी लिहून काढला. संवादाची प्रत त्याच्याकडून वाचून घेण्यात आली. त्याच्यासह आणखी चौघांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले.
डाटा डिलिट केला
सावंत यांना आपणच फोन केला होता. याबाबत गुन्हा दाखल होताच मोबाईलमधील संभाषणाचा डेटा स्वत:च डिलिट केल्याची कबुली त्याने चौकशीत दिल्याचे सूत्रांकडून समजले.
चेन्नईला पळून जाण्याची तयारी
कोरटकर हा हैदराबादमार्गे चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत होता. यासाठीच तो तेलंगणातील मंचरियाल रेल्वे स्टेशनला गेला होता. अंतरिम जामीन रद्द झाल्यापासून त्याने मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर बंद केला होता. या काळात त्याने ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणेही टाळले, अशी माहिती पोलिसांनी दिली.