29.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रइंद्रजीत सावंतांना धमकी दिली नाही

इंद्रजीत सावंतांना धमकी दिली नाही

प्रशांत कोरटकर यांची स्पष्टोक्ती

नागपूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप इंद्रजीत सावंत यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केलेली आहे. त्यानंतर आता प्रशांत कोरटकर यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, इंद्रजीत सावंत यांना मी ओळखत देखील नाही. त्यामुळे धमकी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मला अनेक फोन येत आहेत. तो आवाज माझा नाही, मी त्यांना कॉल केला नाही आणि त्यांचा नंबरही माझ्याकडे नाही.

छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने इतिहास संशोधकासारख्या मोठ्या व्यक्तींवर बोलण्याचा विषयच येत नाही. मी त्यांची पोस्ट वाचली नाही. मात्र, मला सकाळपासून जे फोन येत आहेत, त्यावरून असे दिसतेय की याला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही कोरटकर यांनी यावेळी सांगितले.

मी नागपूरचे पोलिस आयुक्त आणि राज्याचे सायबर प्रमुख यांना अर्ज करून हा खोडसाळपणा ज्यांनी केला आहे, त्याचा शोध घेण्याची विनंती करणार आहे. इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या व्यक्तीनेही शहानिशा न करता, माझ्याशी चर्चा किंवा फोन न करता थेट समाज माध्यमावर पोस्ट केली. त्यामुळे मला सकाळपासून शेकडो धमकीचे फोन आले आहेत. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करणार आहे, असे प्रशांत कोरटकर म्हणाले.

तर इंद्रजीत सावंत जबाबदार राहतील
मी सामाजिक जीवनात कधीही कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही. मी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरले, असा कुठेही उल्लेख नाही. यामुळे मला जो काही मन:स्ताप होत आहे, यात काही चुकीचे घडले, तर याला पूर्णत: इंद्रजीत सावंत जबाबदार राहतील, असेही कोरटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR