लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत लातूर जिल्हयातील १९१ केंद्रावर रविवारी दोन सत्रात इयत्ता ५ वी व ८ वी च्या २७ हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. तर या परीक्षेला १ हजार ३४८ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणा-या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता ५ वी) १७ हजार ५१० विद्यार्थी बसले होते. रविवारी सकाळी ११ ते १२.३० व दुपारी २ ते ३.३० या दोन सत्रात १७ हजार ५१० पैकी १६ हजार ६२५ विद्यार्थ्यांनी ११३ केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा दिली. तर ८९१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. सदर परीक्षा ३०० गुणांची असून सकाळ सत्रामध्ये मराठी, गणित १५० गुण व दुपार सत्रामध्ये बुध्दीमत्ता, इंग्रजी १५० गुण याप्रमाणे दोन सत्रात घेण्यात आली.
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता ८ वी) ११ हजार ३९३ विद्यार्थी बसले होते. यापैकी १० हजार ९३८ विद्यार्थ्यांनी ७८ परीक्षा केंद्रावर दोन सत्रात परीक्षा दिली. तर ४५७ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यृत्ती मिळणार आहे. सदर परीक्षा जिल्हयात शांततेत पार पडल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.