विनोद उगीले
लातूर : नीट पेपर लीक प्रकरणी लातूरातील दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार इरन्ना मष्णाजी कोनगुलवार हा अखेर सीबीआयने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१ अ प्रमाणे बजावलेल्या नोटीसी नंतर दिल्लीतील मुख्य कार्यालयात सीबीआय समोर हजर झाल्याचे समजते. याला सीबीआयने दुजोरा दिला नसला तरी तशी माहिती सरकारी वकील व इरन्नाच्या वकिलानी दिली आहे. दरम्यान शुक्रवार दि. ७ रोजी त्याला उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी दरम्यान तात्पुरता दिलासा मिळाला होता. त्याच्या अटकपूर्व अर्जावरील सुनावणी अजून बाकी असून सीबीआय त्यास परत चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
देशभरात चर्चेला आलेल्या लातूरातील नीट प्रकरणातील लातूरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील लातूर शहरात वास्तव्यास असलेला व देगलूर जि. नांदेड येथील मुळ रहिवासी असलेला व या प्रकरणात मागील सात महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी नामे इराण्णा मष्णाजी कोनगुलवार याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मा. सत्र न्यायालय लातूर ते मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली पर्यंत धाव घेतली होती. परंतु सदरील जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
त्यानंतर दि. ३ फेबु्रवारी रोजी फरार इराण्णा मष्णाजी कोनगुलवार यास सीबीआय यांच्याकडून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१ अ प्रमाणे नोटीस देण्यात आली व सीबीआय मुख्य कार्यालय दिल्ली येथे हजर होण्यास सांगितले, होते. परंतु या आधी सुद्धा कलम ४१ अ ची नोटीस दिल्यानंतर देखील या गुन्ह्यातील एन. गंगाधरप्पा, संजय जाधव व जलीलखाँ पठाण यांना इतर सीबीआय पथकाकडून अटक करण्यात आली होती.
त्यामुळे आरोपी इरन्ना कोणगुलवार याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर व सीबीआय पथक यांच्याकडून अटक होण्याची भीती असल्याने मा. उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
दि. ७ फेबु्रवारी रोजी सदरील अर्जावर सुनावणी झाली व सुनावणी दरम्यान सीबीआय यांच्याकडून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१ अ प्रमाणे नोटीस दिल्याने तपासदारम्या आरोपीस सीबीआय अटक करणार नसल्याचे विधान सरकार पक्षातर्फे करण्यात आले व आरोपी यास सीबीआय ऑफिस दिल्ली येथे चौकशीसाठी जाण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान शनिवार दि. ८ फेब्रवारी रोजी इरन्ना कोनगुलवार हा सीबीआयच्या दिल्ली मुख्य कार्यालयात तपास अधिका-यांसमोर चौकश्शीसाठी हजर झाल्याची माहीती व दुजोरा उच्च न्यायालयातील सरकारी वकील अॅड. सचिन पन्हाळे व इरन्ना कोनगुलवार यांचे वकिल अॅड. संकेत पळणीटकर यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिला असून इरन्ना कोनगुलवार यास पुन्हा सीबीआय चोकशीसाठी बोलावण्याची शक्यता असून चौकशीनंतर पुन्हा जामीन अर्जावरती मा. उच्च न्यायालयात सुनावणी बाकी आहे.