25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रईडीपासून सुटका मिळावी यासाठी भाजपसोबत गेलो

ईडीपासून सुटका मिळावी यासाठी भाजपसोबत गेलो

छगन भुजबळांचा खळबळजनक दावा

नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी एक मोठा दावा केला आहे. ईडीपासून सुटका व्हावी यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात याबद्दल नमूद करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात राजकीय वर्तुळातील अनेक खळबळजनक गोष्टींचा दावा करण्यात आला आहे. या पुस्तकात ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाखाली राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील कथित सत्य नमूद करण्यात आले आहे. यात छगन भुजबळ, शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, अनिल देशमुख यांसह अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, छगन भुजबळ यांनी मुलाखतीत सांगितले होते की, ‘‘मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या होत्या. मी जर उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी १०० कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असे अनिल देशमुखांना सांगण्यात आले होते.

मलाही अशाप्रकारे अडकवण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू होता. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही. मला, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी हातमिळवणी केल्याशिवाय आपली सुटका नाही, असे सर्वांनाच वाटत होते. त्यामुळे आम्ही हा विषय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला.

शरद पवारांना हे सर्व काही समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांश नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून सर्वांचीच सुटका झाली’’, असे छगन भुजबळांनी म्हटल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

अजित पवारांनाही घाम फुटला होता
अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. साखर कारखान्याच्या विक्रीवरून अजित पवार यांना घेरण्यात आले होते. या कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यामुळे अजित पवारांनाही घाम फुटला होता. यानंतर अजित पवार यांनी लगेचच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली होती. यावर तोडगा कसा काढायचा यावर चर्चा झाली. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरू झाली. त्यांच्या इमारतीमधील चार मजले ईडीने जप्त केले. सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी करण्यात आली. या तिन्ही नेत्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करू’’, अशी भूमिका शरद पवारांकडे मांडली होती.

‘‘शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिल्यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर वाटाघाटी सुरू केल्या. भाजपबरोबर हातमिळवणी करण्याच्या बदल्यात ईडीची चौकशी सुरू असलेल्या नेत्यांची प्रकरणे बंद केली जातील. तसेच यासाठी यंत्रणेकडून पाठपुरावा केला जाणार नाही’’, असा दावा या पुस्तकात करण्यात आला. मात्र छगन भुजबळ यांच्या कार्यालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही, असे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR