22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रईशान्य मुंबईत विकासाचे मुद्दे भरकटले

ईशान्य मुंबईत विकासाचे मुद्दे भरकटले

टोकाचे आरोप-प्रत्यारोप, मराठी-गुजराती वादासह विविध मुद्दे चर्चेत

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील लोकसभा निवडणूक मतदानासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उत्तर-पूर्व मुंबई (ईशान्य मुंबई) लोकसभा मतदारसंघात प्रचार करतानाच महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सुरुवातीला विकासाच्या मुद्यावर बोलले जात होते. परंतु आता या मतदारसंघातील प्रचार मुद्यावरून गुद्यावर पोहोचला आहे. मराठी विरुद्ध गुजराती, डम्प्ािंग ग्राऊंड, मानखुर्द-शिवाजीनगर ड्रग्जमुक्त, मुलुंडमध्ये धारावी पुनर्वसन आदी मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

घाटकोपर पश्चिममधील समर्पण नामक एका गुजरातीबहुल सोसायटीतील रहिवासी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आम्ही भाजपला मत देऊ, असे सांगत ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांना सोसायटीत प्रचारपत्रक वाटण्यास मनाई केली. यावरून महाविकास आघाडी उमेदवार संजय पाटील यांनी या मतदारसंघात मराठी विरुद्ध गुजराती असा वाद भाजपकडून निर्माण केला जात आहे, असा आरोप केला. तसेच यासंबंधी निवडणूक आयुक्त आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली. त्यावर माझे विरोधकच मराठी-गुजरातीला निवडणुकीचा मुद्दा बनवत असल्याचे सांगून त्यांना विकासावर बोलायचे नसल्याचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी स्पष्ट केले.

महायुतीचे उमेदवार कोटेचा यांची मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये प्रचारयात्रा सुरू असतानाच दगडफेक करण्यात आली होती. यावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या गुंडांनी प्रचाररथावर दगडफेक करून नुकसान पोहोचवल्याचा आरोप केला. हे आरोप फेटाळून लावत सरकार तुमचेच असून पोलिस बंदोबस्तात घेऊन प्रचार करा, असा सल्ला पाटील यांनी दिला. तसेच गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द ड्रग्जचा अड्डा झाला असून हा परिसर ड्रग्जमक्त करणार असल्याचेही कोटेचा यांनी स्पष्ट केले. मात्र गेल्या दहा वर्षांत या भागात का कारवाई झाली नाही, असा प्रश्न पाटील यांनी विचारला. अलिकडे थेट आरोप-प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्याऐवजी थेट आरोप होत आहेत.

धारावी पुनर्वसनाचा मुद्दाही चर्चेत
मुंबईतील धारावी विस्थापितांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही या लोकसभा निवडणुकीत चर्चेत आला. कुठल्याही परिस्थितीत धारावीकरांचे पुनर्वसन करू दिले जाणार नाही. धारावीमध्येच त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन देत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भाजपच्या एकाही नेत्याने या प्रकल्पाला विरोध केला नसल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये स्थानिकांमध्ये प्रचार करताना धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मुलुंडकरांचा विरोध असतानाही भाजपचा एकही नेता या आंदोलनात सहभागी झाला नसल्याचा आरोप झाला. त्यावरूनही वाद रंगला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR