मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आज सलग दुसरा विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ गडी राखून पराभव केला. १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाने १५.३ षटकात १९९-३ धावा करून विजय मिळवला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, स्टार फलंदाज इशान किशन तसेच सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले.
बुमराहने ५ विकेट घेत आरसीबीचा पराभव केला. यानंतर इशान, सूर्याचा झंझावात पाहायला मिळाला.
मुंबईसाठी सलामीवीर फलंदाज इशान किशनने ६९ (३४) आणि सूर्यकुमार यादवने ५२ (१९) धावांची शानदार खेळी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. या आयपीएलमधील मुंबईचा हा दुसरा विजय आहे तर आरसीबीचा हा पाचवा पराभव आहे.
दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत १९६-८ धावांची मजबूत धावसंख्या उभारली. ज्यात कर्णधार फाफ ड्युप्लेसिस ६१ (४०), रजत पाटीदार ५० (२६) आणि अखेरीस दिनेश कार्तिकच्या नाबाद ५३ (२३) यांच्या धमाकेदार खेळीचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने घातक गोलंदाजी करत ५ बळी घेतले. बुमराहला त्याच्या अप्रतिम खेळासाठी (५-२१ विकेट्स) सामनावीराचा किताबही मिळाला. हा विजय मुंबई इंडियन्ससाठी खूप खास आहे.