22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरई-केवायसी नसल्याने ३९१ शेतकऱ्यांचे जवळपास ४० लाख रुपये अडकले

ई-केवायसी नसल्याने ३९१ शेतकऱ्यांचे जवळपास ४० लाख रुपये अडकले

सोलापूर : २०२२ मधील अतिवृष्टी व संततधार पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे उत्तर तालुक्यातील ५८५ शेतकऱ्यांचे ८३ लाख ११ हजार रुपये बँकेत पेंडिंग असून आधार कार्ड मॅपिंग व इतर कारणांमुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही. याशिवाय ई-केवायसी नसल्याने ३९१ शेतकऱ्यांचे जवळपास ४० लाख रुपये मंजूर असूनही शासन जमा करीत नाही. एकीकडे सरकार पैसे घेऊन तयार आहे, मात्र शेतकरी घ्यायला तयार नाहीत असे चित्र आहे.

२०२२ मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी, संततधार व अवेळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राज्य शासनाने अतिवृष्टी, संततधार व अवेळी पावसाची वेगवेगळी मदत मंजूर केली होती. ती रक्कम जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाकडून जमा न करता थेट शासनच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत आहे. आधार कार्ड मॅपिंग, आधार इनअ‍ॅक्टिव्ह, खाते बंद व खाते गोठविल्याने उत्तर तालुक्यातील ५८५ शेतकऱ्यांचे ८३ लाख ११ हजार रुपये त्या-त्या खात्यावर पेंडिंग आहेत. ही रक्कम शासनाने शेतकऱ्यांनी दिलेल्या बँकेकडे वर्ग केली आहे. मात्र बँकिंग प्रॉब्लेममुळे खात्यावर जमा होत नाही.

शेतकऱ्यांनी स्वतः बँकेत जाऊन प्रॉब्लेम सोडवून खात्यावर रक्कम जमा करून घ्यायची आहे.याशिवाय ई-केवायसी पूर्ण नसल्याने ३९१ शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून पैसे आले नाहीत. शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड, केईवायसी करून घेतले तर शासनाकडून ऑनलाइन पैसे खात्यावर जमा होतात. बीबीदारफळ येथील ८३ शेतकऱ्यांचे (आधार मॅपिंग, आधार इनअ‍ॅक्टीव्ह, खाते बंद, बँकेने खाते गोठविल्याने) ९ लाख ८२ हजार व ३१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने चार लाखांहून अधिक रक्कम शासनाकडे अडकली आहे. ३१ शेतकऱ्यांनी आपले सेवा केंद्रात जाऊन के-वायसी केली व बँकेत जाऊन प्रॉब्लेम सोडविला तर १४ लाखांहून अधिक रक्कम खात्यावर जमा होणार आहे.

अकोलेकाटी, बाणेगाव, होनसळ, गुळवंची, खेड, कोंडी, कुमठे, मार्डी, नान्नज, नरोटेवाडी, पडसाळी, सेवालालनगर, राळेरास, पाकणी, शिवणी, बेलाटी, रानमसले, तिर्हे, कळमण, कौठाळी, हिरज, पाकणी, हगलूर, गावडीदारफळ, वडाळा, बीबीदारफळ, साखरेवाडी, इंचगाव, भागाईवाडी, पडसाळी, वांगी तसेच हद्दवाढ भागातील गावच्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.शेतकऱ्यांच्या याद्या मराठीत तलाठी कार्यालयात लावाव्यात. तहसील कार्यालयाने मोठ्या प्रमाणावर शेतकरी असलेल्या गावात कॅम्प राबवावेत. सामाजिक जबाबदारी म्हणून आम्हीही सहकार्य करू. सव्वा कोटी रुपये परत जाणे शेतकर्‍यांसाठी नुकसानीचे आहे.असे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR