लातूर : प्रतिनिधी
शहरात उघड्यावर कचरा टाकणा-या नागरिकांच्या विरोधात लातूर शहर महानगरपालिकेकडून कारवाई केली जात आहे. या अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये नागरिकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. मनपाच्या वतीने शहरात दैनंदिन कचरा संकलन केले जाते. तरीसुद्धा काही ठिकाणी नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे.यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी व उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. प्रभाग क्रमांक १८ मधील दुर्गादेवी चौक येथे कचरा उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक धोंडीबा सोनवणे, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत भोसले, संतोष रणदिवे व कर्मचा-यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
शहरातील नागरिकांनी आपल्याकडील कचरा ओला व सुका असे वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा. यापुढे उघड्यावर कचरा टाकणा-यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
नेहमी कचरा पडणारी ठिकाणे स्वच्छ करून त्या ठिकाणी वाचन कट्टा व वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम पालिकेने हाती घेतला आहे. या अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मधील झिंगणप्पा गल्ली भागात अग्रसेन भवन, प्रभाग क्रमांक ९ मध्ये बसवेश्वर महाविद्यालय व प्रभाग क्रमांक १२ मधील चंद्रोदय कॉलनी येथे स्वच्छता करून वाचनकट्टा तयार करण्यात आला. वृक्ष लागवड ही करण्यात आली.