पुणे : यंदाच्या तीव्र उन्हाळ्याचा आणि वाढत्या तापमानाचा मोठा फटका टोमॅटो पिकाला बसला असून उत्पादन घटल्याने बाजारातील आवक कमी झाली आहे. परिणामी पुण्यासह इंदापूर तालुक्यातील प्रमुख आठवडे बाजारांमध्ये टोमॅटोचा दर प्रतिकिलो सरासरी ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडले असून उत्पादकांनाही उत्पादन घटल्याने अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.
गेल्या काही हंगामात टोमॅटोला मिळालेल्या कमी दरामुळे अनेक शेतक-यांनी लागवडीचे क्षेत्र कमी केले किंवा पर्यायी पिकांकडे मोर्चा वळवला. त्यामुळे यंदा उत्पादनात घट झाली आहे. त्यातच खते, कीटकनाशके, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढल्याने बाजारभावात वाढ झाली आहे.
इंदापूर तालुक्यात प्रामुख्याने रबी हंगामात टोमॅटोची लागवड केली जाते. यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ६० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. जून-जुलै हा टोमॅटोची आवक कमी असण्याचा कालावधी असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत असून दर वाढले आहेत.
उष्णतेचा उत्पादनावर मोठा परिणाम
टोमॅटो पिकासाठी १८ ते ३० अंश सेल्सिअस तापमान अनुकूल मानले जाते; मात्र यंदा तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने फुलांचे परागीभवन बाधित झाले. परिणामी फुलगळ वाढून उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच तीव्र सूर्यप्रकाशामुळे फळांवर ‘सनस्कॅल्ड’चा प्रादुर्भाव होऊन अनेक टोमॅटो विक्रीयोग्य राहत नसल्याचे दिसून आले आहे.
















