परभणी : शेतक-यांनी पीकविमा योजनेत चुना लावला या विधानाचा शेवटी ‘परतीचा चुनाच’ झाला, शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौ-यावर आले आणि त्यांच्या विधानाच्या विरोधात शेतकरी संघटनांचा स्फोट झाला. त्याचवेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी ‘दादांचे विधान म्हणजे जखमेवर मीठ नाही, तर चुना चोळणे आहे’ असा घणाघाती शाब्दिक हल्ला चढवला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस, महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे, ‘ताफ्यावर प्रतिकात्मक चुना फेकून’, त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ‘चुना लावलाय कुणी, आम्ही की तुम्ही?’ असा संतप्त सवाल करत कार्यकर्त्यांनी पवारांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. काही क्षणातच परिसरात गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि ताफा पुढे नेण्यात आला.
पोलिसांची तयारी अधिक असल्याने मोठा अनर्थ टळला, पण या सगळ्या घटनेमुळे पवारांच्या परभणी दौ-याला राजकीय वादळाचा रंग आला. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पीकविमा योजनेतील अनियमिततेवर बोलताना पीकविमा योजनेत ‘शेतक-यांनीच चुना लावला’ असे विधान केले होते. हे विधान आगीत तेल ओतल्यासारखे ठरले. आधीच विमा कंपन्यांच्या लाभासाठी चाललेल्या योजनेच्या विरोधात असलेल्या शेतक-यांच्या मनात खदखद होतीच, त्यातच हे विधान आल्यानंतर शेतकर्याम्ध्ये संताप होता, तो या चुना आंदोलनातुन प्रकट झाला. तसेच शेतकरी दिवसेंदिवस उद्ध्वस्त होत आहे आणि त्याच्यावर आरोप करणे म्हणजे अन्यायावर शिक्कामोर्तब करणे आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
कोण लावतंय कोणाला चुना?
चुना फेकणारे ताब्यात, पण विधान करणारे मोकळे. शेतकरी जर ‘चुना’ लावतो, तर कंपन्या काय गुलाबपाणी शिंपडतात? पावसाने फसवले, विम्याने झुलवले आणि वर नेत्यांनी दोष दिला, शेतकरी अजून किती गिळायचा? ज्या योजना कंपन्यांना फायदेशीर ठरतात, त्यात शेतक-यांनी कधीच नफा पाहिलेला नाही. आंदोलन करणारे तुरुंगात, आणि ‘ताफा’ निवांत पुढ, हेच का लोकशाहीचे नवे समीकरण? विधान केल्यावर माफी नाही, पण विरोध केल्यावर अटक, हे समीकरण आता ‘चुना नीति’ म्हणूनच ओळखायला हवे असे आंदोलकांनी म्हटले आहे.