उमरगा : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यातील असंतोष अधिकच तीव्र झाला आहे. बुधवारी (दि. ९) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास उमरगा तहसील कार्यालयात मराठा आंदोलकांनी थेट तहसीलदारांच्या दालनात घुसून त्यांची खुर्ची बाहेर आणत प्रशासकीय आवारात जाळून टाकल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली. कार्यालयातील शिपायाला धक्काबुक्की करत केलेल्या या आक्रमक आंदोलनामुळे तहसील परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी शासकीय कामकाज सुरू होत असतानाच काही मराठा आंदोलक अचानक उमरगा तहसील कार्यालयात धडकले. आंदोलकांनी थेट तहसीलदार गोविंद येरमे यांच्या दालनाकडे धाव घेतली. यावेळी दरवाजावर कर्तव्यावर असलेले शासकीय शिपाई राम शिंदे यांनी आंदोलकांना दालनात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत शिपाई शिंदे यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना बाजूला ढकलून दालनात बळजबरीने प्रवेश केला.
जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
दालनात प्रवेश केल्यानंतर आंदोलकांनी तहसीलदारांची अधिकृत खुर्ची उचलून थेट कार्यालयाच्या मोकळ्या आवारात आणली. तेथे खुर्चीवर ज्वलनशील पदार्थ टाकून ती भरदिवसा सर्वांसमोर पेटवून देण्यात आली. खुर्ची जळत असताना आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘मनोज जरांगे पाटील आगे बढो’ अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शासकीय खुर्ची अशा प्रकारे सार्वजनिकरीत्या जाळल्याचे पाहून कर्मचारी व नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
चौघांना तात्काळ घेतले ताब्यात
घटनेची वार्ता समजताच उमरगा पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी जाळपोळ करणा-या आंदोलकांपैकी अण्णासाहेब गोविंद पवार, महादेव गोविंद माने, विठ्ठल दशरथ पवार (तिघे रा. नाईचाकूर, ता. उमरगा) आणि वैजनाथ आबा काळे (रा. माडज, ता. उमरगा) या चौघांना जागेवरूनच ताब्यात घेतले.
अधिकारी व कर्मचा-यांची पोलिस ठाण्यात धाव
या घटनेच्या निषेधार्थ महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उमरगा पोलिस ठाण्यात गोळा झाले. तहसीलदार गोविंद येरमे यांनी स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांची भेट घेतली व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली.
आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
या घटनेतील चारही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचे प्रत्यक्ष फोटो आणि व्हीडीओ उपलब्ध असून, त्या पुराव्यांच्या आधारे संबंधितांवर कडक कायदेशीर कलमान्वये कारवाई केली जाईल.
गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या बेकायदेशीर कृत्याची प्रशासनाने अतिशय गंभीर दखल घेतली आहे. कर्तव्यावरील कर्मचा-यांना धक्काबुक्की करून शासकीय मालमत्ता जाळणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. संबंधितांविरुद्ध रीतसर गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
















