22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिव  उमेदवारांच्या विजयासाठी कस लागणार आमदारांचा ....

  उमेदवारांच्या विजयासाठी कस लागणार आमदारांचा ….

सतीश टोणगे : कळंब
लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने मतदारसंघातील विद्यमान आमदारांना लोकसभेच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीची ही अवघड परीक्षा द्यावी लागणार आहे. या मतदारसंघात बहुतांश आमदार भाजपचे असल्याने त्यांना काहीही करून मनात असो किंवा नसो आपापल्या मतदारसंघात ‘घड्याळाचे काटे’ गतिमान करावे लागणार आहेत. यासाठी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. या जिल्ह्यात अनेक नेत्यांनी चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून कार्यकर्त्यांना न विचारता भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मतदारही त्यांना ‘हाबाडा’ देण्याच्या तयारीत आहेत.

धाराशिव जिल्ह्यात औसा व बार्शी हे दोन तालुके बाहेरचे असून येथे भाजपाचे आमदार आहेत. तर उमरगा, भूम परंडा, शिवसेना शिंदे गट तर तुळजापूर भाजपा, धाराशिव, कळंबमध्ये ठाकरे गटाचे प्राबल्य आहे. या मतदारसंघात पाच आमदार भाजपा-सेना गटाचे तर एक आमदार ठाकरे गटाचे आहेत.
या जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री बसवराज पाटील हे भाजपवासी झाले असले तरी त्यांच्यामागे एकही कार्यकर्ता, पदाधिकारी गेलेला नाही. हीच अवस्था तुळजापूरचे मा. आ. मंत्री मधुकरराव चव्हाण यांचीही. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांचा मुलगा सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये एकट्यानेच प्रवेश घेतला. यांच्यासोबत पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र दिसले नाहीत.

पक्षांतर करताना आम्हाला विचारात घेतले नसल्याने आम्हीही आता, ‘हाबाडा’ देणार, अशी भाषा मतदार बोलू लागले आहेत. तर विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनाही ही लढत सोपी नाही. कर्मचारी विरोधात बोलत आहेत. तर फक्त, ‘फोनवर बोले खासदार’म्हणून मतदार चर्चा करत असताना त्यांनी, ‘सग्यासोय-यांचा’ विकास केल्याची कुजबूज होऊ लागली आहे. त्यांच्यासोबत नेतेमंडळी नसल्याने मतदारांवर त्यांची मदार आहे. डीसीसी बँक, तेरणा कारखाना यातील कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. पाच वर्षे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात घेतले नसल्याचेही बोलले जात आहे. एकंदर ही निवडणूक आता येणा-या विधानसभेची रंगीत तालीम असल्याने विद्यमान आमदार व इच्छुक उमेदवारांना जीव तोडून काम करावे लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या, अडगळीत पडलेल्या पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना फोन करून प्रवाहात आणले आहे, तर भाजपने सर्व आमदारांना गाफील न राहता काम करा, तरच विधानसभेचा विचार केला जाईल, असा दम दिल्याचे समजते. नॉट रिचेबल असणारे पालकमंत्री तानाजी सावंत यांनीही प्रचारात आघाडी घेतल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एकंदर सध्या तरी वातावरण चांगलेच तापले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR