लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा नगरपरिषद तसेच रेणापुर नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने युध्दपातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी दि. ६ नोव्हेंबर रोजी पक्षाचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत इच्छुक उमेदवारांच्या अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आणि उमेदवारी अंतिम करण्याच्या तारखांचा संपूर्ण रोडमॅप जाहीर केला.
निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाने संपूर्ण वेळापत्रक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आखले असून, संपूर्ण प्रक्रिया लातूरमधील काँग्रेस भवन येथूनच पार पडणार आहे. जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरून सादर करण्याची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर २०२५, सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. हे अर्ज काँग्रेस भवन, लातूर येथे स्वीकारले जाणार असून काँग्रेसचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी आणि काँग्रेसच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष ह.भ.प. शरद देशमुख महाराज यांच्याकडे अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
९ नोव्हेंबरला अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, दुस-याच दिवशी म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी जिल्हा निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये दाखल झालेल्या सर्व अर्जांची छाननी करून उमेदवारांच्या नावांची शिफारस तातडीने प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात येणार आहे. जिल्हा समितीने शिफारस केलेल्या नावांवर १२ नोव्हेंबर रोजी प्रदेश निवड समिती निर्णय घेणार आहे. प्रदेश निवड समिती या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करून उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी सर्व इच्छुकांनी वेळेचे बंधन पाळून आणि पक्षाच्या शिस्तीनुसार अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अभय साळुंके यांच्या या स्पष्ट वेळापत्रकामुळे लातूर काँग्रेसने निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

