32 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeलातूर‘उष्णतेशी लढा’ देण्यासाठी ‘हरित लातूर’चा संकल्प!

‘उष्णतेशी लढा’ देण्यासाठी ‘हरित लातूर’चा संकल्प!

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, या अनुषंगाने विचारमंथन करण्यासाठी लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत ‘उष्णतेशी लढा’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या की, लातूर जिल्ह्यातील उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येतील. त्याची सुरुवात ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून केली जाईल. यासाठी ‘अमृतधारा अभियान’ हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच उष्णतेशी लढा देण्यासाठी सन २०३३ पर्यंत हरित लातूरचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यावेळी उपस्थित होते. तसेच नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या शाश्वत अधिवास विभागाचे प्रमुख रजनीश सरीन, पुणे येथील ज्येष्ठ वास्तुविशारद अविनाश हावळ, सार्वजनिक आरोग्य चळवळीतील तज्ज्ञ डॉ. अनंत फडके यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
वातावरणीय बदलामुळे उष्णतेच्या लाटा सारखे संकटे येत आहेत. त्यामुळे केवळ भौगोलिकच नाही, तर आर्थिक परिणामही दिसून येत आहेत. जवळपास ४० टक्के अर्थकारण हवामान बदलामुळे प्रभावित होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जगभरात लाखो लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. आपल्या जिल्ह्यातही काही प्रमाणात उष्णतेच्या लाटेची समस्या जाणवते आहे. आगामी काळात हे संकट अधिक तीव्र होवू नये, यासाठी लवकर उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक पाऊल उचलेले जाईल. लातूर जिल्ह्याला ५० वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सन २०३२ पर्यंत वृक्ष लागवड आणि संवर्धनावर भर देवून ‘हरित लातूर’ ही संकल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात पुढील दोन महिन्यात ‘अमृतधारा अभियान’ प्रभावीपणे राबवून ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’साठी विविध कामे केली जातील. प्रत्येक शासकीय इमारतीसह खासगी इमारतींवरही ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ करण्यासाठी लोकसहभागातून हे अभियान राबविले जाईल. आगामी काळात पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुराविण्याला प्राधान्य दिले जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपले कार्यालय, आपले राहते घर येथे ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ करून या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा. तसेच विहीर पुनर्भरण, वृक्ष लागवड आदी उपक्रमालाही गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना हाती घेणे गरजेचे :  
लातूर जिल्ह्यातही गेल्या काही वर्षात वातावरणीय बदलांमुळे झालेल्या परिणामांचा सामना येथील नागरिकांना करावा लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे यापेक्षाही अधिक गंभीर संकटाला आपल्याला सामोरे जावे लागू शकते. मात्र वेळीच सावध होवून पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना हाती घेतल्यास पाणी टंचाई, उष्माघात यासारख्या संकटांपासून दूर राहता येणे शक्य आहे. सध्या मोठ्या प्रमणात शहरांचे काँक्रीटीकरण होत असल्याने शहरातील उष्णतेचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी बांधकाम करतांना उष्णता शोषून घेणारे साहित्य वापरण्याला प्राधान्य द्यायला हवे. तसेच शहरामध्ये वृक्ष लागवड, हिरवी मैदाने निर्माण करायला हवीत, असे पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी सांगितले.
ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणण्याची गरज :  
हवामानातील बदलांचा दुष्परिणाम म्हणून यावर्षीची उष्णतेची लाट दीर्घकाळ राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उष्णतेच्या लाटेवर नियंत्रण मिळविणे, तसेच आगामी काळात या संकटापासून सुटका करून घेण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा दोन प्रकारच्या उपाययोजना हाती घेणे आवश्यक असल्याचे पुणे येथील ज्येष्ठ वास्तुविशारद अविनाश हावळ यांनी सांगितले. ताडीने करावयाच्या उपाययोजनामध्ये अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या परिसरात वृक्ष लागवड, टेरेस गार्डन, सौरउर्जा निर्मिती, बायोगॅसची निर्मिती व वापर, ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ यासारख्या बाबींवर लक्ष द्यावे लागेल. तसेच दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम करताना ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणणे, शहरातील हरित पट्टे विकसित करण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य चळवळीतील तज्ज्ञ डॉ. अनंत फडके यांनी उष्माघाताची कारणे, उष्माघात झाल्यानंतर घ्यावयाची खबरदारी आदी बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच उष्माघातापासून बचावासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करून काय खबरदारी घ्यावी, याची माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकिब उस्मानी यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR