लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणा-या जिल्हा परिषद शाळेतील व अनुदानित अशा २ हजार १८२ शाळेतील जवळपास २ लाख ८० हजार ५७९ विद्यार्थ्यांना दररोज मध्यान्ह भोजन शिजवून पोषण आहार खाण्यासाठी दिला जातो. सदर पोषण आहार हा मार्च पासून संपला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना इतर शाळेतून उसणवारीवर तथा आपल्या क्रेंडीटवर पोषण आहार घेऊन तो विद्यार्थ्यांना दीड ते दोन महिण्यापासून देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्हा परिषद शाळेतील व अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणा-या २ लाख ८० हजार ५७९ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी दररोज ४ हजार ३५ स्वयंपाकी व मदतनीस अन्न शिजवून दुपारी पोषण आहार खाण्यासाठी देतात. लातूर जिल्हयातील शाळांना पोषण आहार पुरवठा करण्याच्या टेंडरचा करार कालावधी फेब्रुवारी अखेर संपला. त्यामुळे जिल्हयातील शाळांना मार्च पासून ते आज पर्यंत मु्ख्याध्यापकांना पोषण आहारासाठी लागणारा तांदूळ, मूग दाळ, हरभरा दाळ, मसूर दाळ, चवळी, मटकी, मिठ, मोहरी, कांदामसाला, तेल, मसला हा एकतर पदरमोड करून अथवा शेजारच्या शाळेतून (त्यांच्याकडेही उपलब्ध असेल तर) उसणवारीवर घेऊन तो उपलब्ध करण्यासाठी आज पर्यंत कसरत करावी लागत आहे.