पुणे : प्रतिनिधी
राज्यातील उसाच्या गाळप हंगामात उसाअभावी १३९ साखर कारखाने बंद झाले असून साखर उत्पादन ७७८. ४१ लाख क्विंटल इतके झाले आहे तर साखर उतारा ९.४१ टक्के इतका मिळाला आहे. यंदाच्या हंगामात एकूण २०० साखर कारखान्यांनी हंगाम घेतला असून त्यामध्ये ९९ सहकारी आणि खासगी १०१ कारखाने आहेत.
राज्यामध्ये कोल्हापूर विभागाने सर्वाधिक म्हणजेच ११.०५ टक्के इतका उतारा तर २०१.०६ लाख मे. टन गाळप पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात २०७ कारखान्यांनी हंगाम घेतला होता. तसेच चालू हंगामात उसाचे गाळप ८२६.८७ लाख मे. टन झाले असल्याची माहिती सांगण्यात आली.
यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यातच केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. देशात साखरेचा सुरुवातीचा साठा सुमारे ८० लाख टन होता. तर चालू हंगामात साखर उत्पादन २७० ते २८० लाख टन होणे शक्य आहे यामुळे देशात साधारणपणे ३५० लाख टन साखरेची उपलब्धता राहण्याची शक्यता आहे. साखर निर्यात आणि देशाची एकूण मागणी लक्षात घेता तुटवडा जाणवणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
……