जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथून एका शेतक-याचा ऊस घेऊन ट्रक उदगीर येथील कारखान्याकडे जात असताना जळकोटपासून तीन किलोमीटर अंतरावर , पाटोदा बुद्रुक गावाजवळील अवघड वळणावर ट्रक पलटी होऊन या ट्रकमधील चालक आणि क्लिनर हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत .
घटनेची माहिती मिळताच जळकोट पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार लक्ष्मण नागरगोजे यांना पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी घटनास्थळी पाठवले. यावेळी नागरगोजे यांनी नागरिकांच्या मदतीने ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालक आणि क्लीनरची सुटका केली तसेच त्यांना रुग्णालयात पोहचविले. वांजरवाडा येथून उसाने भरलेला ट्रक ( क्र एमएच ४० -सीडी १२५४) पाटोदा येथील वळणावर आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला. यामुळे शेतक-याचा संपूर्ण ऊस अस्ताव्यस्त पडला होता . तसेचया ट्रक मधील चालक हैबत शिवाजी भालके राहणार टाकळी आणि क्लिनर गजानन उत्तम जाधव राहणार भोपाळ तांडा ता नायगाव हे दोघेही गंभीर जखमी झाले. जळकोट तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर असलेल्या पाटोदा बुद्रुक गावाजवळील मोठ्या वळणावर अनेक अपघात होत आहेत. वारंवार राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यााला सांगून देखील हे वळण कमी करण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे दिसून येत आहे.