21.1 C
Latur
Saturday, September 27, 2025
Homeलातूरऊस उत्पादक शेतक-यांना रेणा सहकारी साखर कारखाना ३१५० रुपये दर देणार

ऊस उत्पादक शेतक-यांना रेणा सहकारी साखर कारखाना ३१५० रुपये दर देणार

रेणापूर : प्रतिनिधी
सत्तेवर असलेले  ट्रीपल सरकार इंजिन जोडण्यात मग्न असून अतिवृष्टीने शेतक-यांच्या जमिनी पार खरबडून गेलेल्या असताना पिकं, विमा किंवा पंचनामे करायला काय शिल्लक राहिलेले आहे?, असा सवाल  राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी करत जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठया प्रमाणावर शेतक-यांचे नुकसान झाले आहे. ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना देता त्याच बरोबर अडचणीत पडलेल्या शेतक-यांना लाडक्या भावाना मदतीची फुंकर घाला, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी नमुद करुन रेणा साखर कारखाना गाळप हंगामात उसाला ३१५० रुपये प्रति मेट्रिक टन दर देण्याची घोषणा केली.
रेणापूर तालुक्यातील दिलीपनगर, निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ सप्टेंबर रोजी झाली. त्या सभेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, व्हॉईस चेअरमन अँड. प्रवीण पाटील, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, माजी आमदार ज्येष्ठ संचालक अँड त्रिंबक भिसे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, मारुती महाराज कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषराव हाके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, कार्यकारी संचालक बी. वी. मोरे, रविशंकर बरमदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की, राज्यात एकीकडे साखर कारखाने अजूनही शेतक-यांचे पैसे एफआरपी देत नाहीत शेतकरी आंदोलन करीत आहे, असे चित्र दिसत असताना आपल्या लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखाने सर्वाधिक उसाला भाव देवुन एफ. आर. पी. सहित रक्कम देवुन शेतक-यांच्या विश्वासाला पात्र राहून संस्था कार्य करीत असून त्यामुळे राज्यात मांजरा साखर परिवाराचा नावलौकिक प्राप्त झालेला आहे, असे सांगून परिवारातील संस्थांचे १५० हरवेस्टर स्वत:च्या मालकीचे असून संस्था अधिक भाव देवुन शेतक-यांच्या कुटुंबांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम मांजरा परिवार करत आहे आम्ही विकासाचे सूत्र हातात घेतलेले आहे राजकारण हे व्यवसाय नाही ही पांडुरंगाच्या वारी आहे त्यामुळे या वारीला आम्ही जाणार, असेही ते यावेळी म्हणाले.
राज्यात शेतक-यांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी शुभमंगल, शैक्षणिक, महिला बचत गटांना आर्थिक मदत करणारी लातूर जिल्हा बँक चेअरमन धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सूक्ष्म नियोजन करत चांगले कार्य करीत असून या बँकेने  १७०० कोटी रुपयांचे पिक कर्ज शेतक-यांना पुरवठा केलेला असून त्यांना मोठा आधार देण्याबरोबरच साखर कारखाण्यास भक्कम आधार बँकेला दिला आहे. राज्यात नावलौकिक असलेल्या पहिल्या टॉप दोन मध्ये लातूर बँक असून १० हजार कोटींच्या टर्नर कडे बँकेची वाटचाल सुरू असल्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी सांगितले. तसेच  रेणा साखर कारखाना आगामी काळात ७.५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवले असून त्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर सेवेत राहील यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे वाचन केले. त्यास अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष अँड प्रवीण पाटील अनुमोदन दिले. सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूरी दिली.  कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी अहवालाचे वाचन केल.े   या वार्षिक सर्वसाधारण सभेस  रेणा साखर कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, संभाजी रेड्डी, गोविंद पाटील, तुकाराम कोल्हे, शंकरराव पाटील, रणजित पाटील, सतीश पवार, तानाजी कांबळे, बालाजी हाके, चंद्रचुड चव्हाण, नरसिंग इंगळे, अमृताताई स्नेहलराव देशमुख, वैशालीताई पंडितराव माने, उस उत्पादक शेतकरी सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सुत्रसंचलन सचिन सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक चंद्रकांत सुर्यवंशी यांनी मानले.
मांजरा परिवारातील साखर कारखान्याचा ऊस तोडणी यंत्राचा पॅटर्न 
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख म्हणाले, सध्या नवीन तंत्रज्ञान असल्याने मांजरा परिवारातील अनेक साखर कारखाने  केवळ साखर गाळप करणे यावर न थांबता इतर उपपदार्थ तयार करून शेतक-यांना अधिक दर देण्याचा प्रयत्न करत आहेत. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून परिवारातील साखर कारखान्यास उस तोडणी साठी हार्वेस्टर देण्याचे काम केले असून त्यातून ८ हजार शेतक-यांना रोजगार देण्याचे काम जिल्हा बँकेकडून झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच रेणा साखर कारखान्याकडून सामजिक दायित्व म्हणून  सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका केंद्रातून जवळपास ४ हजार विद्यार्थी लाभ घेत आहेत त्यातून अनेक विद्यार्थी सरकारी नोकरी करीत आहेत अनेक जन  शैक्षणिक सुविधेचा लाभ घेत आहे यांचाही उल्लेख करत शेतक-यांच्या मदतीला परिवार कायम उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मांजरा परिवारातील संस्थांचे कार्य उत्कृष्ट
या प्रसंगी बोलताना खासदार डॉ शिवाजीराव काळगे म्हणाले, राज्यात सहकारी संस्थांमध्ये मांजरा साखर परिवाराने नावलौकिक मिळवला असून केवळ साखर उत्पादन न करता सौर ऊर्जा इथेनॉल निर्मिती, असे विविध उपपदार्थ प्रकल्प राबवल्याने शेतक-यांना अधिक भाव या परिवारामार्फत मिळतो. त्यामुळे राज्यात नव्हे तर देशात मांजरा पॅटर्न निर्माण झाला आहे त्याचे सर्व श्रेय राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या पारदर्शक नेतृत्वाखाली नावारूपाला आलेला हा परिवार आपले लातूरचे भूषण ठरले आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR