नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात राजनैतिक पावले उचलली. पाकिस्ताननेही विविध राजनैतिक मार्ग वापरण्यास सुरवात केली. त्याअंतर्गत भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपला आकाशमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भारतापेक्षा पाकिस्तानचेच अधिक नुकसान होत असून पाकिस्तानला कोट्यवधी रूपयांचा फटका यातून बसत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला आर्थिक नुकसान व्हावे याकरिता भारतीय विमानांसाठी आपले आकाशमार्ग पाकिस्तानने बंद केले. यामुळे उत्तर भारतातून उड्डाण करणा-या अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु, पाकच्या या निर्णयामुळे भारताचे फारसे नुकसान न होता, पाकिस्ताननेच स्वत:च्या पायावर कु-हाड मारून घेतल्यासारखे झाले आहे.
२०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांची एअरस्पेस बंद केली होती. त्यावेळी पाकिस्तानला जवळपास १०० मिलियन डॉलर्सचे नुकसान झाले होते. दररोज सुमारे ४०० उड्डाणांवर परिणाम झाला होता. ज्यामुळे पाकिस्तानच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी व पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला मोठे नुकसान झाले होते.
आता पहलगाम हल्ल्यानंतर आकाशमार्ग पुन्हा बंद केल्यामुळे पाकिस्तानचे पुन्हा नुकसानच होणार आहे. एअर इंडिया व इंडिगोच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांना याचा फटका बसणार आहे. दिल्ली, अमृतसर, जयपूर, लखनौ व वाराणसीसारख्या शहरांमधून होणा-या उड्डाणांवर थेट परिणाम झाला असून येथील उड्डाणांनंतर विमानांना आता लांबचा मार्ग घ्यावा लागत आहे. पाकिस्तानच्या आकाशातून जाण्याऐवजी ही विमाने आता अरबी समुद्राच्या मार्गाने जात आहेत.