नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद राहिल्यास भारतीय विमान कंपन्यांना दरमहा ३०६ कोटींहून अधिक अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. दुसरीकडे, एअर इंडियाने असा अंदाज लावला आहे की, जर हवाई क्षेत्र एक वर्ष बंद राहिले तर त्यांना ६०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ५,०८१ कोटी रुपयांचे नुकसान होईल. यावर मात करण्यासाठी, एअर इंडियाने सरकारला आर्थिक मदत करण्याचे सुचवले आहे. पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद केल्याच्या परिणामांवर विमान कंपन्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला त्यांचे मत आणि सूचना दिल्या आहेत.
पाकिस्तानने २४ एप्रिल रोजी भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते आणि भारताने ३० एप्रिल रोजी पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. विमान कंपन्या पर्यायी उड्डाण मार्गांवरही विचार करत आहेत. उत्तर भारतातील शहरांमधून होणा-या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर दर आठवड्याला ७७ कोटी रुपये अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि उड्डाण कालावधी देखील वाढतो. यामुळे, मंत्रालय विमान भाडेवाढीसह विमान कंपन्या आणि प्रवाशांशी संबंधित पैलूंचे मूल्यांकन करत आहे. याशिवाय, विमान कंपन्या पर्यायी उड्डाण मार्गांवर देखील विचार करत आहेत जेणेकरून उड्डाण खर्च कमी करता येईल.
पाकिस्तानला दक्षिण आशियासाठी लांब मार्ग स्वीकारावा लागेल. भारताने ३० एप्रिलच्या रात्री पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. पाकिस्तानची सर्व प्रकारची विमाने २३ मे पर्यंत भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करू शकणार नाहीत. भारताने पाकिस्तानसाठी हवाई दलाच्या जवानांना नोटीस बजावली होती.