इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील सर्वाधिक खपाच्या ‘डॉन’ या दैनिकाने कार विक्रीवरील एका रिपोर्टमध्ये चक्क ‘एआय’ प्रॉम्प्ट प्रकाशित केला. ‘एआय’चा वापर करून लिहिलेल्या बातमीमधील प्रॉम्प्ट छपाईवेळी तसाच राहिला. प्रकाशित झालेल्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तुफान चर्चा रंगली आणि हा वादाचा विषय ठरला आहे. अखेर दिलगिरी व्यक्त करत या चुकीवर पडदा टाकण्यात आला आहे.
पाकिस्तानमधील ‘डॉन’ या इंग्रजी दैनिकाने एक बातमी प्रकाशित केली. ही बातमी देशातील ऑटो क्षेत्रातील तेजीवर होते. त्याचे शीर्षक होते ऑटो विक्रीला ‘गियर’. मात्र या बातमीच्या शेवटी ‘तुम्हाला हवे असल्यास, मी ‘फ्रंट-पेज स्टाईल’मध्ये अधिक आकर्षक सादरीकरण… तयार करू शकेन. तुम्हाला ते करायला आवडेल का?…’ असा ‘एआय’ प्रॉम्प्ट छापला गेला. दैनिकाने तत्काळ डिजिटल आवृत्तीमध्ये ही चूक दुरुस्त केली. मात्र प्रकाशित झालेल्या आवृत्तीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आणि हा वादाचा विषय ठरला.
मूळ बातमीत संपादकीय प्रक्रियेतील ‘एआय’-जनरेटेड अतिरिक्त मजकूरही आला होता. हा मजकूर डिजिटल आवृत्तीतून संपादित करून काढण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, ‘एआय’धोरणाचे उल्लंघन झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असा खुलासा प्रकाशित करून सारवासारव करण्यात आली.

