मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत आज बैठक होणार होती. मात्र त्याआधीच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली. किरकोळ ताप, कणकणी असल्याने दिवसभर विश्रांती घेणार आहेत. मुख्यमंत्रिपद नाही तर किमान गृहमंत्रिपद मिळेल या आशेवर असलेले एकनाथ शिंदे विश्रांतीसाठी सातारा येथील आपल्या गावी निघून गेले.
यामुळे दिल्लीत ठरल्याप्रमाणे मुंबईत होणारी बैठक अचानक रद्द करण्यात आली. यानंतर महायुतीत ते नाराज असल्याची चर्चा रंगली. आज दिवसभर कुणालाही भेटणार नसल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जो काही निर्णय घेतला आहे तो एकनाथ शिंदे यांनाच माहीत आहे.
उपमुख्यमंत्री व्हायचे की नाही हे शिंदेच ठरवतील. त्यांनी सरकारमध्ये रहावं अशी आमची इच्छा आहे. मी खरे सांगतो, तुम्हाला कदाचित पटणार नाही. पण एकनाथ शिंदे यांना ताप होता, सर्दी होती. त्यांची प्रकृती चांगली नाही. पण ते नाराज नाहीत, पण अस्वस्थ आहेत. चांगल्या हवामानासाठी ते गावी गेले आहेत, असे उदय सामंत म्हणाले.
महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ५ डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाची चाचपणी केली जात आहे. दादर येथील शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्कवर २ डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याचे ठरत होते, मात्र ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे शिवतीर्थ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे ५ डिसेंबरला आझाद मैदानावर हा शपथविधी होण्याची शक्यता आहे.