मुंबई : प्रतिनिधी
उबाठाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून शिंदेंना शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आलेला पुरस्कार, दिल्लीत भरवण्यात आलेले ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन यावर भाष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र ज्यांनी कमजोर केला ते साहित्य संमेलनाच्या मांडवात, एकनाथ शिंदेंची कर्तबगारी काय? असा घणाघात या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. दिल्लीतील विज्ञान भवनात मोठ्या थाटात हा उद्घाटनाचा सोहळा पार पडला. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आहेत. या अगोदरच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावरून उबाठाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली होती.
साहित्य संमेलने ही आता नित्याची बाब झाली आहे. मराठी साहित्यिक व कलावंत हे कोणतीही भूमिका धड घेत नाहीत आणि सरकारशी जुळवून घेण्यातच ते स्वत:ला धन्य मानतात. प्रश्न महाराष्ट्राच्या अस्मितेचा असो नाहीतर राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा, महाराष्ट्राचे साहित्यिक आणि कलावंत पुढाकार घेऊन काहीच करत नाहीत. अशा सगळ्यांचे एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे व त्याचे उद्घाटन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ तारखेला केले. साहित्य संमेलनासारख्या सोहळ्यांचा राजकीय वापर कसा होतो हे दिल्लीतील संमेलनात पुन्हा दिसले, असा टोला ‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून लगावण्यात आला आहे.
शिंदेंवर घणाघाती टीका
दिल्लीतील साहित्य संमेलनात राजकारण्यांचीच भाऊगर्दी जास्त हे चित्र दिसले. महादजी शिंदे हे दिल्लीपुढे झुकणारे नव्हते, तर दिल्लीचे तख्त राखणारे मराठा योद्धा होते. पानिपतच्या युद्धातही महादजी यांनी पराक्रम गाजवला. महादजी यांनी दोनवेळा दिल्ली जिंकली. लाल किल्ल्यास वेढा घातला. दिल्लीच्या बादशहाला पळवून लावले. हा इतिहास पाहिला तर एकनाथ शिंदे हे पुरस्काराच्या प्रतिष्ठेत व चौकटीत कोठेच बसत नाहीत, अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे.