बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत अजित पवार यांच्या अर्थखात्याविषयी तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर निधीवाटपावरून नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले.
दरम्यान, बारामती येथील एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अमित शहा असे काही बोलले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार सांगणे बंद करा. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडे तक्रार करतील, असे वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा माझ्याशी बोलतील. तेवढे आमचे संबंध चांगले आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली.
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत अजून निर्णय नाही
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत अजून निर्णय झाला नाही. आपण काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित सुरू आहे. डीपीसीसाठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे, तो सुद्धा आम्ही दिला आहे. त्यावर मार्ग निघेल. मार्ग निघाल्या निघाल्या तुम्हाला सांगितलं जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले.
उशीर झाल्यामुळे मीच भाषण टाळले
रायगड किल्ल्यावर शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी मिळाली. नंतर नाराजी नको म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना भाषण करायला सांगितले, अशी चर्चा होती याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार यांनी सांगितले की, रायगडावर जो अमित शहांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मला त्यांनी बोलायला सांगितले होते. मात्र, जवळपास त्या ठिकाणी दोन वाजून गेले होते. उशीर झाल्यामुळे मीच स्वत: मुख्यमंत्री आणि अमित शहा साहेब बोला, असे सांगितल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं…
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओला सांगितलं आहे, तहसीलदाराला सांगितले आहे, पीआयला सांगितले आहे. काकालाही म्हटलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालता येत नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नाहीतर काका कुतवल. नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत, असेही अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.