लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून तुरीची आवक ब-यापैकी वाढली आहे. शुक्रवारी तुरीची आवक ८ हजार ६१ क्विंटल होती तर किमान भाव १० हजार ७९१ रुपये, कमाल भाव ९ हजार २०१ तर सर्वसाधारण भाव १० हजार रुपये प्रति क्विंटल होता. शनिवारी तुरीची आवक ६ हजार ५०३ क्विंटल झाली त्याला कमाल भाव १० हजार १०० रुपये, किमान भाव ९ हजार ६०१ रुपये तर सर्वसाधारण भाव ९ हजार ७०० रुपये मिळाला. एका दिवसात प्रति क्विंटल तुरीच्या भावात ६९१ रुपयांची घसरण झाली.
लातूर जिल्ह्यात ऊस, सोयाबीन खालोखाल तुरीचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात तुरीचे क्षेत्रही मोठे आहे. तुरीच्या बाबतीत लातूर जिल्हा देशाला मार्गदर्शक ठरला आहे. लातूरच्या बाजारपेठेत तूर डाळीला निघालेला भाव संपूर्ण देशभरात लागु होतो. संपूर्ण देशाला तूर डाळ पुरविण्याची क्षमता लातूर जिल्ह्यात आहे. परंतू, यंदा मान्सूनचा पाऊस पुर्ण क्षमतेने पडला नाही. नेहमी लातूरच्या मदतीला धावून येणा-या परतीच्या पवसानेही यंदा हुलकावणी दिली. त्यामुळे त्याचा परिणाम तुरीच्या उत्पादनावर झाला. तुरीचे उत्पादन घटले आहे. अशातच केंद्र शासनाने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून बाजारभावाने खुल्या बाजारात तूर खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत. म्हणजेच यंदा केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सात हजार रुपये प्रतिक्विंल या हमीभावापेक्षा अधिकच्या दरात शासनाच्या माध्यमातून तूर खरेदी होणे अपेक्षित आहे.
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी तुरीची ६ हजार ५०३ क्विंटल आवक झाली होती. तुरीला कमाल कमाल १० हजार १०० रुपये किमान ९ हजार ६०१ रुपये तर सर्वसाधारण भाव ९ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल होता. गुळाची आवक २८४ क्विंटल झाली. त्यास कमाल ३ हजार ५७५ रुपये, किमान ३ हजार ३०० रुपये, सर्वसाधारण भाव ३ हजार ४०० रुपये निघाला. गव्हाची केवळ ४१ क्विंटल आवक झाली. गव्हास कमाल ३ हजार रुपये, किमान २ हजार १०० रुपये तर सर्वसाधारण दर २ हजार ८०० रुपये होता. हायब्रीड ज्वारीची आवक १८ क्विंटल होती. त्यास कमाल २ हजार ३०० रुपये, किमान २ हजार रुपये तर सर्वसाधारण २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल मिळाला.
रब्बी ज्वारीची आवक १५० क्विंटल झाली. बाजरीची आवक २७ क्विंटल होती. त्याला कमाल भाव ३ हजार, किमान २ हजार ८०० रुपये तर सर्वसाधारण भाव २ हजार ९०० रुपये मिळाला. ३९९ क्विंटल इतकी हरभ-याची आवक होती. त्याला कमाल भाव ५ हजार ७४१ रुपये, किमान भाव ४ हजार ९०० रुपये तर सर्वसाधारण भाव ५ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल मिळाला. मुगाची आवक ३७ क्विंटल झाली. त्यास कमाल भाव ८ हजार, किमान ७ हजार ३०० तर सर्वसाधारण भाव ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल मिळाला.