मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे आणि पोलिसांच्या झटापटीत, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. अक्षय शिंदेच्या या ‘न्याय एन्काऊंटर’वरून विरोधकांनी महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून, राज्यातील इतर गंभीर घटनांकडे लक्ष वेधले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी थेट भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराचा आकडा समोर आणत घेरलं आहे.
पोलिसांशी झालेल्या झटापटीत अक्षय शिंदे याला ठार केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. नराधमाला शिक्षा व्हायलाच हवी होती, पण राज्यात कायद्याचे राज्य आहे. कायद्यानुसार शिक्षा झाली असती, तर कायद्याची जरब निर्माण झाली असती, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
एका एन्काऊंटरने न्याय होत नसतो, याकडे देखील विरोधकांनी लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर ‘एक्स’ खात्यावर पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराचा आकडा मांडला आहे.
अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढणा-या महायुती सरकारमधील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत महिलांवरील अत्याचाराच्या २१३ घटना घडल्या आहेत. केवळ एका एन्काऊंटरने न्याय मिळाला, असं कोणाला वाटत असेल, तर ही मोठी धूळफेक आहे.
न्यायालयाने चौकशी करावी
बदलापूरमधील नराधमांना शिक्षा व्हायलायच हवी होती. परंतु बदलापूरमध्ये ज्या शाळेत हा प्रकार घडला, ती शाळा भाजपशी निगडीत असलेल्यांची आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे अक्षय शिंदेबरोबर गेली आहेत. त्यामुळे बदलापूरच्या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयाच्या निगराणीखाली सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी देखील अमोल कोल्हेंनी केली.