पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रतन टाटा यांना श्रद्धांजली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेतृत्त्व, एक दयाळू व्यक्तीमत्त्व आणि एक विलक्षण माणूस होते. त्यांच्या रूपाने देशातील एक महान उद्योजक हरपला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
टाटा समुहाने भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व दिले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले. रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक कारणांमध्ये ते आघाडीवर होते. रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझे मन भरून आले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
देशाचा लौकिक वाढविणारा
उद्योगपती हरपला : पवार
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणा-या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणिवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
देशाने गौरवशाली पुत्र गमावला : गडकरी
देशाने एक गौरवशाली पुत्र गमावला आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मी स्तब्ध झालो आहे. रतन टाटा आणि मी आमचे ३० वर्षांपासूनचे खूप उत्तम संबंध होते. रतन टाटा यांच्या कौटुंबिक आयुष्यातही मी होतो, त्यांचा आणि माझा अनेक वर्षांचा स्रेह होता. मी त्यांची विनम्रता, त्यांचा साधेपणा सगळेच पाहिले आहे. त्यांच्या आयुष्यात प्रामाणिकपणा आणि करुणा ही मूल्ये त्यांनी कायमच जपली. रतन टाटा हे अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. भारतातील अग्रगण्य उद्योजकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि रोजगार निर्मितीत त्यांनी मोलाचे योगदान दिले, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.