सत्ताधारी पक्षांकडून व्हीप जारी, कॉंग्रेस पक्षाचाही व्हीप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एक देश, एक निवडणूक विधेयक मंगळवारी संसदेत सादर होणार आहे. देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती लोकसभेत मांडली जाणार आहे. यासाठी सत्ताधारी पक्षाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.
एक देश एक निवडणूकच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात एकदाच निवडणूक घेण्यात आली तर त्यातून होणा-या फायद्याची यादीच सध्या सत्ताधारी पक्षाकडून वाचून दाखवली जात आहे. एक देश, एक निवडणुकीची अंमलबजावणी झाली तर त्यातून खर्च कमी होईल, प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल, असे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे
वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्यासाठी किमान ६ विधेयके मांडावी लागतील आणि सरकारला त्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात एनडीएचे बहुमत असले तरी दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळवणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.
मोदी सरकारकडे
किती खासदार?
राज्यसभेच्या २४५ जागांपैकी एनडीएकडे ११२ तर विरोधी पक्षांकडे ८५ जागा आहेत. सरकारला दोन तृतीयांश बहुमतासाठी किमान १६४ मतांची गरज आहे. एनडीएकडे लोकसभेच्या ५४५ पैकी २९२ जागा आहेत. दोन-तृतीयांश बहुमताचा आकडा ३६४ आहे. परंतु ही परिस्थिती बदलू शकते. कारण बहुमताची गणना केवळ उपस्थित सदस्यांच्या आणि मतदानाच्या आधारे केली जाते.