लातूर : प्रतिनिधी
वाहनांची सुरक्षा तसेच चोरी झालेल्या वाहनांची ओळख पटविण्यासाठी आता हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आले आहे. याचे अनेक फायदे वाहनधारकांना असून १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.
या अद्ययावत नंबर प्लेटची सुविधा जिल्हा तसेच तालुकास्तरावर करण्यात आली आहे. दुचाकी व ट्रॅक्टरसाठी ५३१, तीन चाकी वाहनांसाठी ५९० व लाईट मोटार वाहन व प्रवासी कार याकरीता ८७९ रुपये मोजावे लागणार आहे. यामुळे चोरी झालेल्या वाहनांची ओळख पटणे, छेडछाड प्रतिरोधक तंत्रज्ञानाने वाहन सुरक्षीत राहते. तसेच डुप्लिकेट नंबर प्लेट तयार करणेही कठीण आहे. वाहनधारकांना वाहन नोंदणी क्रमांक, वाहन मालकाचे नाव, वाहनाचा प्रकार, असा तपशील भरुन ऑनलाईनद्वारे पेमेंट करता येणार आहे. डेडलाईन न पाळल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. या नंबर प्लेटमुळे नियमांचे पालनही सुलभ होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी नजीकच्या केंद्रावर जाऊन नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी केले आहे.