लातूर : प्रतिनिधी
सन २०१९ पुर्वीच्या सर्वच वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी काढले आहेत. या आदेशानूसार लातूर जिल्ह्यातील सुमारे ४ लाख वाहनांना ‘एचएसआरपी’नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. दुचाकी आणि ट्रॅक्टरला ४५० रुपये, तीन चाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी, अवजड वाहने ट्रेलर आदी प्रकारच्या वाहनांना ७४५ रुपये दर असअून त्यावर जीएसटी लागणार आहे. जिल्ह्यातील ४ लाख वाहनधारकांना प्रत्येकी सरासरी ५०० रुपये खर्च गृहीत घरला तर यातून २० कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे.
वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणा-या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून २०१९ पुर्वीच्या सर्वच वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी काढले आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यानंतर मात्र मोटार वाहन कायद्यानूसार कारवाई होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिेलेल्या निर्देशानूसार १ एप्रिल २०१९ पुर्वी उत्पादीत सर्व प्रकारच्या वाहनांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्यासाठी राज्य शासनाच्या परिवहन विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या वाहनांना नवीन नंबरप्लेट बसविण्यासाठी राज्यात तीन संस्थांची निवड झाली आहे. लातूरसाठी एफटीए सोल्यूशन्स प्रा. लि. ची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन नंबरप्लेट तयार करीत असताना वाहनांचा नोंदणी क्रमांक, चेसीस, इंजिन क्रमांक, वाहनमालकाचा मोबाईल नंबर एजन्सीकडे घेतला जात आहे. नवीन पद्धतीने नंबरप्लेट न बसविल्यास वाहनधारकांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील जवळपास ४ लाख वाहनधारकांना नंबरप्लेट बदलावीच लागणार आहे.