मुंबई : प्रतिनिधी
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) प्लेट बसवण्याच्या सरकारच्या निर्देशांचा गैरफायदा घेत सायबर फसवणुकीच्या नव्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे. आधी बनावट लिंकद्वारे फसवणूक केली जात होती. मात्र, आता सायबर भामट्यांनी थेट सरकारी संकेतस्थळासारखे बनावट संकेतस्थळ तयार केले असून, त्याद्वारे नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे.
मुंबई पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार, एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बनावट लिंकद्वारे फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला होता. सहाय्यक परिवहन आयुक्तांनी ५ मार्च रोजी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर फसवणूक करणा-यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला.
मात्र, सायबर गुन्हेगारांनी आता अधिक गंभीर पाऊल उचलत थेट सरकारी संकेतस्थळाच्या नावाशी साधर्म्य असलेले बनावट संकेतस्थळ तयार केले आहे. ‘बुक माय एचएसआरपी डॉट कॉम’ या नावाने हे संकेतस्थळ उभारण्यात आले असून, त्याद्वारे नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. प्राथमिक तपासणीत हे संकेतस्थळ राजस्थानमधून चालवले जात असल्याचे समोर आले आहे.