पुणे : प्रतिनिधी
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या वर्षी हा पुरस्कार अहमदाबाद येथील आयआयएमचे संचालक प्रा. भरत भास्कर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू, डब्ल्यूएचओचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ व एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, सुप्रसिध्द चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक व लेखक विवेक अग्निहोत्री आणि प्रख्यात गायक व संगीतकार शेखर सेन यांना देण्यात येणार आहे.
तसेच सामाजिक कार्यकर्ते व सर्च फाऊंडेशनचे संचालक पद्मश्री डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना विशेष जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी दिली.
हा कार्यक्रम सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी स. १० वा. राजबाग, लोणी-काळभोर येथील जगातील सर्वांत मोठ्या वर्ल्ड पीस डोममध्ये होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येकी सव्वा लाख रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे २१ वे वर्ष आहे.
जागतिक दर्जाचे संशोधन व समाजावर शाश्वत प्रभाव निर्माण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात विशेष यश संपादन केल्याबद्दल प्रा. भरत भास्कर यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. हवाई प्रवास सुलभ व सामान्यांना परवडेल आणि देशाची प्रगती साधण्याच्या कार्यासाठी राम मोहन नायडू किंजरापू यांना ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्काराने’ गौरविण्यात येईल. बौध्दिक क्षेत्रात बहुआयामी व्यक्तिमत्त्व, चित्रपटनिर्माता, लेखक विवेक अग्निहोत्री आणि रंगभूमीच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल शेखर सेन यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्काराने’ गौरविण्यात येणार आहे. भारतीय वैद्यकीय संस्थांमध्ये संशोधन क्षमता वाढवणे आणि आरोग्य विज्ञानात जागतिक भागीदारी वाढवण्यावर भर देणा-या शास्त्रज्ञा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे पद्मश्री डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी आरोग्यसेवेबरोबरच ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना भारत अस्मिता जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आपल्या आचार, विचार, कृतीने व सेवेने ज्यांनी देशाच्या नावलौकिकात भर टाकली, विविध मार्गाने आपली अमूल्य सेवा देशाला समर्पित केली अशा व्यक्तींच्या गौरवासाठी या पुरस्काराची योजना आहे.