पुण्यात जरांगे पाटील आंदोलनात सहभागी, सरकारला इशारा
पुणे : प्रतिनिधी
पोलिस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणा-या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. याचे पडसाद आता राज्यात उमटले असून, विविध ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरल्याने आता ऐन मनपा निवडणुकीच्या काळातच आंदोलन पेटल्याने सरकार कोंडीत सापडले आहे. दरम्यान, या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडीला फोन लावून इशारा दिला.
पुण्यात हजारो युवक रस्त्यावर उतरले असून, एमपीएससीच्या विरोधात कालपासून जोरदार आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात परीक्षार्थी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडीला फोन केला. जोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतोच, असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले असून, छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकात शेकडो परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आणि जोरदार आंदोलन केले. तसेच लातूर येथेही मोठ्या संख्येने परीक्षार्थी आंदोलन करीत असून, एमपीएससीच्या धोरणाविरोधात प्रचंड रोष व्यक्त करीत आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयात
थेट ओएसडीला फोन
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वत: मनोज जरांगे पाटील पुण्यात हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलकांसोबत आंदोलनाला बसले. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडीला फोन केला. तसेच विखे पाटील यांच्याशीही थेट संपर्क साधत विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. प्रश्न सुटला नाही तर लक्षात ठेवा, निवडणुका तोंडावर आहेत, असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

