नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जीवनशैलीत एलईडी बल्बचा वापर झपाट्याने वाढला आहे, परंतु २०२४-२५ च्या अलीकडील जागतिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, एलईडी दिव्यांचा जास्त वापर केल्याने शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होत आहे. या अभ्यासात असे आढळून आले की, शहरी भागांत राहणा-या ७० टक्के जणांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण २० एनजी/एमएल पेक्षा कमी होते आणि ६५ टक्के रहिवाशांमध्ये व्हिटॅमिन बी१२ चे प्रमाण कमी होते.
एलईडी लाईटच्या दीर्घकाळ संपर्कात राहणा-या जसे आयटी व्यावसायिक, ऑनलाइन वर्कर यांना व्हिटॅमिन डी आणि बी-१२ च्या कमतरतेचा त्रास होतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ गुजरात एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थ केरळ २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक १०-१२ तास एलईडी लाईटमध्ये घालवतात, त्यांच्यात व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण १५-२० टक्क्यांनी कमी होते; तर व्हिटॅमिन डीची पातळी १८-२२ टक्के कमी होत असल्याचे आढळून आले.
व्हिटॅमिन डी-३ का मिळत नाही? सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट-बी (यूव्ही-बी) स्पेक्ट्रम त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी-३ (कोलेकॅल्सी फेरॉल) तयार करण्यास मदत करतो, तर एलईडी बल्ब निळ्या प्रकाशाच्या स्पेक्ट्रमवर काम करतात आणि त्यात यूव्ही-बी किरण नसतात, जे शरीरात व्हिटॅमिन डीच्या उत्पादनात अडथळा आणतात.
व्हिटॅमिन बी-१२ चा कसा परिणाम होतो? व्हिटॅमिन बी-१२ च्या शोषणात शरीराचे घड्याळ महत्त्वाची भूमिका बजावते. एलईडी लाइट्सच्या जास्त संपर्कामुळे मेलानोप्सिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सच्या निर्मितीवर परिणाम होतो. शरीरातून व्हिटॅमिन बी-१२ कमी होऊ लागते.