राहुल गांधींचा आरोप, दबावामुळे १६ बीएलओंचा बळी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एसआयआरच्या नावाने देशभरात गोंधळ निर्माण झाला आहे आणि ३ आठवड्यांत १६ बीएलओंना आपले प्राण गमवावे लागले. एसआयआर ही सुधारणा नसून लोकांवर लादलेला विषय आहे. या माध्यमातून सत्तेचे रक्षण करण्यासाठी लोकशाहीचा बळी दिला जात आहे, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
सोशल मीडियावर संताप व्यक्त करीत राहुल गांधी म्हणाले की, मागील ३ आठवड्यांत १६ बीएलओंचा मृत्यू झाला. कोणाला हृदयविकाराचा झटका, कोणाला ताण तर कोणी आत्महत्या केली आहे. निवडणूक आयोगाने अशी व्यवस्था निर्माण केली आहे, जिथे नागरिकांना स्वत:ला शोधण्यासाठी २२ वर्षे जुन्या मतदार याद्यांच्या हजारो स्कॅन केलेल्या पानांमधून जावे लागते. ख-या मतदारांना कंटाळायला लावणे आणि इतर मतदारांची फसवणूक अखंडपणे चालू ठेवणे, हेच एसआयआरचे उद्दिष्ट आहे. भारत जगाताली अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित करतो. परंतु भारतीय निवडणूक आयोग अजूनही कागदपत्रांचे जंगल तयार करण्यावर ठाम आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
जर आयोगाचा हेतू स्पष्ट असता तर मतदार यादी डिजिटल, शोधण्या योग्य आणि मशिनद्वारे वाचता आली असती. निवडणूक आयोगाने ३० दिवसांच्या घाईघाईत काम पूर्ण करण्याऐवजी पारदर्शकता आणि जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढला असता. मात्र, तसे होत नाही. एसआयआर ही एक जाणीवपूर्वक चाल आहे, जिथे नागरिकाना त्रास दिला जात आहे आणि बीएलओंच्या मृत्यूंना दुर्लक्षित केले जात आहे. हे अपयश नाही तर एक षडयंत्र आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

