बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेली एसआयटी आज बीड जिल्ह्यात दाखल झाली. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात १० जणांची टीम या प्रकरणांचा सखोल तपास करणार आहे. एसआयटीच्या स्थापनेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची आशा आहे. आज बसवराज तेली आणि त्यांची टीम बीडमध्ये दाखल झाली व तपासाला वेग आला.
बीड शहर पोलिस ठाण्यात एसआयटीच्या पथकाचे प्रमुख बसवराज तेली यांनी तब्बल पावणेदोन तास वाल्मिक कराड यांची चौकशी केली. त्यानंतर बसवराज तेली हे बीड शहर पोलिस ठाण्यातून पुढील कामासाठी रवाना झाले. पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी तेली यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेली यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मी काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. वाल्मिक कराड याच्यापूर्वी आरोपीच्या अनेक नातेवाईकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. आज सकाळी एसआयटीची टीम बीड जिल्ह्यातील केजमध्ये दाखल झाली आणि संध्याकाळी बीड शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली. सध्या पुढील कारवाई सुरू आहे.