21.9 C
Latur
Tuesday, January 28, 2025
Homeमहाराष्ट्रएसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घ्या

एसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घ्या

नागपूर : प्रतिनिधी
एसटी बसच्या तिकीट दरवाढीवरून राजकारण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीसुद्धा तिकीट दरवाढीस विरोध दर्शवला आहे, तर तिकीट दरवाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
एसटी बसच्या तिकीटची भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, असे ते म्हणत असल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दरवाढीला कशासाठी विरोध केला? मग तिकीट दरवाढीचा निर्णय कुणी घेतला, या परिवहन खात्याचा वाली कोण, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय.

एसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंर्त्यांनी तसे आदेश काढले पाहिजेत. जर परिवहन मंर्त्यांनी दरवाढ केलेली नसेल तर मग दरवाढ नेमकी कोणी केली या प्रश्नाचे सरकारने तात्काळ उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केलीय. मंर्त्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा दरवाढीला विरोध आहे, तर दरवाढ मागे घ्यावी, असेही ते म्हणालेत.

अधिकारी जर खाते चालवतात का, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत-जंमत सुरू आहे. दरवाढीचा हा निर्णय जर अधिका-यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? एखादी घटना अंगलट आली की ते तर अधिका-यांनी केल्याचे सांगायचे आणि जर चांगले काही झाले की श्रेय घ्यायचे, अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे, असा आरोपसुद्धा त्यांनी केला.

…तर संस्था डबघाईला येईल : प्रताप सरनाईक
या सगळ्या प्रकरणावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, प्राधिकरणाची बैठक होत असते. त्यामध्ये त्यांना सर्व अधिकार दिलेले असतात. परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांना अधिकार दिलेले आहेत. एसटी महामंडळ चालवायचे असेल तर दरवाढ करावी लागणार आहे. लोकांना तुम्ही द्याल तेवढे कमीच आहे. दरमहा तीन कोटी नुकसान असेल तर संस्था डबघाईला येईल, अशी परिस्थिती असेल तर काय सुविधा देणार आहेत. ५ हजार ७०० कोटींचा एसटी महामंडळावर बोझा आहे. ८७ हजार कामगारांसोबत अधिकारी वर्ग आहे. काही कटू निर्णय घ्यावे लागतात. असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR