22.4 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeमहाराष्ट्रएसटीच्या ताफ्यात २,६४० नवीन बसेस

एसटीच्या ताफ्यात २,६४० नवीन बसेस

मुंबई : प्रतिनिधी
सर्वसामान्यांच्या हक्काची अशी ओळख असलेल्या लालपरीच्या ताफ्यात आता आणखी २,६४० बसगाड्या येणार आहेत. महाराष्ट्राच्या रस्त्यांवर नवीन लालपरी दिसतील. कारण यावर्षी एसटीच्या ताफ्यात २,६४० नवीन बसेस घेतल्या जाणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी नवीन बसेसबाबत घोषणा केली.

मंत्री सरनाईक यांनी विविध महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यांनी म्हटले की, ‘राज्यातील वाहतूक सेवांचे एकूण चित्र बदलण्यासाठी आम्ही एक मास्टर प्लॅन तयार करत आहोत, ज्यामध्ये स्वच्छता आणि सुरक्षित प्रवासाला महत्त्व दिले जाईल आणि एसटीचे आधुनिकीकरण टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल, असे ते म्हणाले. तथापि, पहिला फायदा एसटी कर्मचा-यांना मिळाला पाहिजे. त्यांना मिळणा-या प्रत्येक सुविधांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे, त्यांच्या गणवेशापासून ते त्यांच्या शौचालये आणि विश्रांतीगृहांपर्यंत. जर त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर प्रवाशांनाही चांगल्या सुविधा मिळतील.

दरमहा ३०० नव्या बसेस येतील
यावेळी सरनाईक यांनी १७ नवीन बसेसचे उद्घाटन केले आणि सांगितले की, जानेवारी अखेरीस १५० लालपरी बसेस येतील आणि त्या ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण भागातील डेपोंना दिल्या जातील. त्यानंतर दरमहा ३०० एसटी बस येतील आणि राज्यभरातील सर्व डेपोंना या बसेस मिळतील.

बोरिवलीत १०० खाटांचा दवाखाना उभारणार
एसटी कर्मचा-यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी बोरिवलीमध्ये १०० खाटांचा आधुनिक दवाखाना देखील बांधला जाईल, जिथे एसटी कर्मचा-यांना राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था केली जाईल, असेही परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले.

एसटीच्या उत्पन्नात होतेय वाढ

एसटी महामंडळाने दिव्यांगांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना आणि पास सवलत योजना सुरू केल्यानंतर एसटी बसेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अमरावती विभागात १ एप्रिल ते ३० डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांत सुमारे १७६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR