कागल : अन्यायी दरवाढ करण्यापेक्षा एसटीने आपल्या नादुरुस्त बसेस सुस्थितीत करून प्रवाशांना चांगली सेवा द्यावी. एसटी बसचे दर न परवडणारे आहेत. ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी. अन्यथा उबाठा शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करून दरवाढ मागे घेण्यास भाग पाडू, असा इशारा शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांना निवेदनात दिला आहे.
एसटी महामंडळाने केलेल्या अन्यायी दरवाढीच्या विरोधात कागल एसटी आगारांमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वतीने संयुक्त आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधात व परिवहनमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आगारप्रमुख संदीप पाटील यांना दोन्ही पक्षांनी निवेदन दिले. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणाला आमचा विरोध आहे. यापूर्वीही निवेदन देऊन नवीन पन्नास बसेस घ्याव्यात, या मागणीचे निवेदन दिले होते. एकीकडे महिलांना व ज्येष्ठांना प्रवासात सवलत दिली जाते. दुसरीकडे मात्र भाडेवाढ प्रवाशांच्या माथी मारली जाते. सुस्थितीत नसलेल्या बसमधून जीव मुठीत धरून विद्यार्थी, महिला व प्रवासी प्रवास करत असतात. शासनाने भाववाढ करण्याऐवजी चांगल्या बसेस द्याव्यात. शासनाने आमच्या भावनांचा विचार न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, शिवसेना तालुकाप्रमुख जयसिंग टिकले यांनी तीव्र विरोध दर्शवला. यावेळी उपतालुका प्रमुख समीर देसाई, कागल शहरप्रमुख अजित मोडेकर, म्हाळू करीकट्टे, संदीप कांबळे यांच्यासह शिवसेना व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.